मी, आई आणि ICU
मी, आई आणि ICU १२- फेब्रुवारी - २०१८ माझ्या डोळ्यासमोर चितेत “ती” भस्मसात होतेय.. कोणीतरी माझ्या खांद्यावर मडकं ठेवून त्यावर ‘अश्म’ ने भोक पाडतय आणि मी ते मडकं मागल्या - मागे टाकून बोंब मारतेय. मोठी मुलगी म्हणून आईला मुखाग्नी देण्याची वेळ आली आहे माझ्यावर.. गेले महिनाभर पोटच्या पोराप्रमाणे लेकीने आईची आजारपणात सेवा केल्याच पुण्य(?!) म्हणे.... १२-जानेवारी-२०१८ गेले आठवडाभर माझी तब्येत ठीक नव्हती, आणि मला बरं नसलं की आईची धावपळ सुरू होते. एकसारखे फोन करून सांगेल, हे कर, ते खा. पण यावेळी आईचा फोन नाही, त्यामुळे शंकेची पाल चुकचुकली. मध्येच एकदा व्यवस्थित बोलली पण आवाज ठीक नव्हता. माझ्या आजारपणासाठी मात्र घरगुती उपचार सांगायचे विसरली नाही. आई ही शेवटी आईच असते..स्वतः कितीही आजारी असली तरी, तिच्यापासून लांब राहणारं तिचं लेकरू आजारी आहे म्हटल्यावर, आपलं लेकरू खाऊन पिऊन औषधं घेतंय की नाही ती काळजी करत बसेल पण स्वतः तोंडाला चव नाही म्हणून घोटभर चहा सुद्धा घेणार नाही.. किर्ती ला विचारलं - खरं सांग आई ला काय होतंय. ती बोलली माहीत नाही पण झोपून राहतेय, BP वाढलंय बहुतेक. माझी तब्येत बरी...