माझे छंद

माझे छंद

छंद म्हणजे काय, तर फावल्या वेळात करण्याचे उद्योग.
आपल्या नेहमीच्या कामाच्या रगाड्यात जोपासलेली आवड.
आता मुंबईकर म्हणतील, फावला वेळ इथे आहे कुणाकडे. फावला वेळ मिळतो तो प्रवासात, ऑफिस साठी जाता-येताना. प्रवासात लोकल मध्ये मिळतो तेवढाच काय तो दिवसभरातील me - time.
प्रवासात सहप्रवासी बायका अनेक छंद जोपासताना दिसून येतात. कोणी विणकाम - भरतकाम करतंय, कोणी वाचन करतंय, कोणी गप्पा मारतंय (गप्पा मारणे हा सुद्धा छंद आहे बरं का, भयंकर ऊर्जा भरलेली असते त्यात)..
आता हा लेख सुद्धा मी माझ्या फावल्या वेळेत तर लिहून काढतेय - प्रवासात. 😁

एखादा छंद जोपासताना मिळणारा उत्साह अगणित असतो, निर्माण होणारी ऊर्जा आपल्याला नेहमीच्या कामात उत्साह आणते.
माझी ऊर्जा वाढवणारा आवडता छंद म्हणजे वाचन, मग ते पुस्तकांचं असो की माणसांचं. मला वाचायला खूप आवडतं.
वाचनाने माणूस समृद्ध होतो, भाषा समृद्ध होते, नव-नवीन भाषा शिकायला मिळतात, दुसऱ्याचे अनुभव ऐकायला मिळतात, त्या अनुभवांचा उपयोग आपल्या आयुष्यात करता येतो.
लेखिका कविता महाजन त्यांचा 'ब्र' या कादंबरीत म्हणतात त्या प्रमाणे -
"आपले सगळे प्रश्न आपणच सोडवत बसण्याचा अट्टहास करू नये. अनेकदा तो दुसऱ्यांच्याही वाट्याला आलेला असतो, त्याचं उत्तरही त्यांनी शोधलेलं असतं, ते विचारावं. उपाय अमलात आणावा आणि मोकळं होऊन जावं. वाचलेला वेळ सत्कारणी लावता येतो."
असंच वाचन करताना आपल्याही प्रश्नांची नकळत उत्तरं मिळत जातात.
वाचनाच्या आवडीतून वैयक्तिक विकासासाठी मदत होते.
मला पुस्तक वाचनाची सवय लावली काकांनी, शाळेत असताना वाचनालयात खातं उघडून दिलं त्यांनी. त्यात बाबांना नेहमी काहीतरी वाचताना पाहात आलेय लहानपणापासून, त्यामुळे वाचनाच्या सवईतून पुस्तकांची आवड कधी निर्माण झाली कळलंच नाही.

तसे माझे छंद स्थळ - काळ - वेळेनुसार निरनिराळे असतात.
आता कोणी म्हणेल, बाईच्या जातीला पुस्तकं वाचत बसून कसं चालेल, घरातली कामं कोणी आटोपायची.??! पण कोण म्हणतं घरातली कामं करणं हा छंद नाही होऊ शकत?? मला आहे हा छंद - वेळ मिळाला की घर टापटीप ठेवायच. घरात दोन माणसं असली तरी पसारा तर होतोच.
लेखिका दीपाली पाटवदकर तिच्या 'घर-अंगण' पुस्तकात म्हणते त्याप्रमाणे प्रत्येक स्त्री ही तिच्या घरातली जादूची परी असते जी जादूची काडी फिरवल्याप्रमाणे सहजगत्या घरातली काम आटोपून मोकळी होते. अशी एक जादूची परी मी लहानपाणासून पाहत आलेय - माझी आई.
मला आठवतं, मी लहानपणी आई ला विचारायचे, 'तुला कंटाळा नाही येत घरातली कामं करत राहायला, मी मोठी झाली की कामाला बाई लावेन'.
आता स्वतःचा संसार थाटला तेव्हा लक्षात आलं, आपलं घर स्वतः लावण्यात किती आनंद मिळतो ते.
दर रविवारी घरातला एक - एक कोपरा घ्यायचा आणि साफ सफाई करून पाहायचं अजून किती सजवू शकतो ते, असा छंदच लागलाय मला सध्या.

आता घरातली कामं म्हटली की स्वयंपाकघर हा गाभा आहे. आणि घरातल्यांना खुश करण्याचा मार्ग पोटातूनच जातो.
हल्ली बाहेरचं खाण्यापेक्षा  तेच पदार्थ स्वतः  घरी बनवण जास्त बरं वाटतं, hygeine म्हणा किंवा healthy म्हणून.
कधी बिघडतं तर कधी जमतं. परंतु कोणी आपलेपणाने खाणार असेल तर आपोआप हाताला चव येते.
महत्वाचं म्हणजे,  तुम्हाला स्वतःला खायची आवड असावी लागते.
Cooking is best meditation to get out of all worries.
त्यामुळे वेग-वेगळे पदार्थ बनवून खाणे आणि खिलवणे हा सुट्टीच्या दिवशीचा meditating छंद आहे माझा.

Weekend चा अजून एक छंद म्हणजे कला जोपासणे. मग त्यात drawing, painting, निर-निराळ्या वस्तू बनवणे असे खूप उद्योग चालू असतात.
पु. ल. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे - 'कला तुम्हाला जगायला शिकवते'.

माझी आई खरी कलाकार होती, कोणतीही वस्तू नुसती बघून बनवायची. पण काही म्हणा,  स्वतः हाताने एखादी वस्तू बनवून आपल्या जवळच्या लोकांना भेट देण्यात जी मजा आहे ती विकत घेऊन देण्यात नाही.

घरातला दुसरा महत्वाचा भाग म्हणजे बाग. मुंबईत गावासारखी परसबाग नसते पण gallery मध्ये एखादं छोटंसं झाड तरी असतंच. आपली बाग फुलवताना, स्वतःच्या मुलासारखं एखादं झाड वाढवताना लागणारे patience आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाची सर कुठेच नाही.


संध्याकाळच्या कातर वेळी तुळशीसमोर दिवा लावून, एखाद्या फुललेल्या गुलाबाशेजारी बसून, हातात वाफाळता चहा घेत, अंधार वाढत जात असताना आकाशातले प्रकाशमान होणारे तारे कधी मोजलेत??
आयुष्यातली बेरीज - वजाबाकी या ताऱ्यांच्या सानिध्यातच मांडत बसते मी...

माझा अजून एक महत्वाचा छंद कसा विसरेन मी, भटकंती. माझी एक मैत्रीण 'lady गुणाजी' म्हणते मला. 😊
केल्याने देशाटन. स्वतःचा शोध घेण्यासाठी सीमोल्लंघन करणं खूप गरजेचं असतं असं मला वाटतं. नेहमीच्या राहाटगाड्यातून बाहेर पडून दूर कुठे गेलं ना की, आयुष्य तुम्हाला नव नवे अनुभव द्यायला सज्ज होतं.
 फिरायला सगळ्यांनाच आवडतं, पण डोळे उघडून भटकणं जास्त गरजेचं असतं, म्हणजे आयुष्यात भरकटायला नाही होत...

बाकी, दिवसभर कामानिमित्त बाहेर असल्याने आणि घरात कोणी नसल्याने एखादा प्राणी पाळायच्या आवडीला काय ती फक्त मुरड घालावी लागतेय, नाहीतर एखादं मांजर तरी नक्की पाळलं असतं.

आता विचार येतोय मनात की, नक्की माझा आवडता छंद  आहे  कोणता??!!
 मग लक्षात आलं, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मनापासून आवडीने करणं हाच नाही का छंद लागलाय आपल्याला. हाच तर छंद आपल्या आयुष्यात गोडी निर्माण करतोय.

- सुप्रिया घुडे
फेब्रुवारी २०१९

Comments

  1. फारच थोडक्यात आटपल, एकेका छंदाचा एक लेख व्हायला हवा तरच तो नीट उलगडेल आता ही माहिती सांगितली असं वाटतंय.

    ReplyDelete
    Replies
    1. हो, actually या लेखाचा purpose काही वेगळं होता, त्यामुळे तो थोडक्यात आटोपला.

      Delete
  2. प्रत्येक फोटो ची कहाणी ही समजेल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर