The Breadwinner

The Breadwinner
by Deborah Ellis

मराठी अनुवाद : अपर्णा वेलणकर





Breadwinner - a person who earns money to support their family, typically the sole one. कुटुंबाचा पोशिंदा

"... आता तू माझी बेटी पण आहेस आणि बेटा पण, परवाना." - अब्बु

तालिबान्यांनी अफगाण काबीज केल्यानंतर, हजारो विस्थापित कुटुंबांपैकी एका कुटुंबातील एक मुलगी - परवाना. सर्वत्र स्त्रियांवर बंधने असताना, ११ वर्षांची लहान मुलगी; केस कापून, मुलांचे कपडे घालून, कमावून आणून स्वतःच्या कुटुंबाला सांभाळणारी.
वय वाढलं तरी तिचं शरीर खुरटंच. तालिबान्यांच्या नजरेला खुपेल असं अजून काहीच शरीरावर उभारलं नव्हतं; त्यामुळे बाई असूनही परवाना रस्त्यावर पाऊल ठेवण्याचा गुन्हा करू शकत होती...

तालिबानी हे मूळचे अफगाणच. पण देशाचा कारभार कसा करावा याबद्दल त्यांच्या स्वतःच्या काही विकृत कल्पना होत्या.
'तालिबान' या शब्दाचा खरा अर्थ 'धर्मचरणाचं अध्ययन करणारा विद्यार्थी'. धर्म माणसाला उन्नत होण्याची, अधिक चांगला माणूस होण्याची प्रेरणा देतो; दया, करुणा या भावना माणसांमध्ये निर्माण करतो. याउलट तालिबानी अल्लाचं नाव घेऊन, धर्माचा धाक दाखवून माणुसकीची मूल्य पायदळी तुडवत होते.
तालिबान च्या कर्दनकाळ सैनिकांनी अफगाणिस्तानातल्या सगळ्या मुलींना, स्त्रियांना घरात कोंडून घातलं होतं. बॉम्बगोळ्यांच्या वर्षावाने चाळण झालेल्या घरांचे दरवाजे कधीचे बंद झाले होते. छोट्या मुलींना शाळांनी हाकलावून लावलेलं.. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना तात्काळ डच्चू देऊन, कमरेवर लाथा मारून घरात डांबलेलं. सगळीकडे चिडीचूप्प शांतता आणि काळ्या बुरख्याआड घुसमटलेल्या, कुजलेल्या स्वप्नांची दुर्गंधी!

तालिबानी सैनिकामध्ये सैतान संचारला की कोणालाही गुन्हेगार ठरवून त्याच्या शरीराचा चुरडून, तुडवून चिखल करत. त्यात समोर बाई असेल तर तालिबानी सैनिकांच्या बुटाचे खिळे अधिक तीक्ष्ण होतं, आणि रक्ताच्या चिळकांड्या अजून जोरात उडत.
फळ्या ठोकून, काळा रंग फासून देशातल्या सगळ्या खिडक्या बंद करण्याचा हुकूम तालिबाननं सोडला होता. घरात कोंडलेल्या स्त्रियांचं नखही बाहेरच्या माणसांना दिसता कामा नये, अशी कडक ताकीद होती.
स्त्रियांना दुकानात जायची परवानगी नव्हती. सगळा बाजार पुरुषांनी करायचा आणि चुकून एखादी स्त्री दुकानात दिसलीच, तर तिला ठेचून मारायची, असे दंडक तालिबान ने घालून दिले होते. नवऱ्याच्या परवानगीची चिठ्ठी आपल्या बुरख्यावार टोचून एखादी स्त्री बाजारात आलीच, तर तिने दुकानाच्या बाहेर रस्त्यावर उभं राहायचं आणि आपल्याला कोणते जिन्नस हवे ते ओरडून दुकानदाराला सांगायचं, असा नियम होता.

अफगाणी लोकांचे हाल वाचताना चुकचुकल्याशिवाय राहत नाही.
अशा प्रकारच्या अमानुष राजवटी आपल्या हयातीत आपण भोगल्या नाहीत हे नशीब समजायचं.

कथा खिळवून ठेवते. मी तर हे पुस्तक येता-जाता लोकल च्या एक-दोन प्रवासात वाचून पूर्ण केलं. आता पुढचे २ भाग विकत घ्यावे लागतील - परवाना आणि शौझिया. उत्सुकता लागलेली आहे.

~सुप्रिया घुडे

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर