बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर
बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर
विषयदृष्ट्या विचार करता; प्रेमभावना, सामाजिक परिस्थिती, व्यक्तिजिवन, कल्पकता प्रधान कथा, हलकी-फुलकी विनोदपर कथा असे विषय दृष्टीसमोर ठेवून या कथांचे संकलन केलेले दिसते.
यातील प्रेमकथेतील नायिका या सामान्य घरातल्या, दुर्दैवी, दारिद्र्यात पिचणार्या, क्वचित अशिक्षित आहेत, परंतु त्यांच्या प्रेमाची जात उंच आहे.
कुसुमाग्रज यांनी अगदी हळुवारपणे प्रेमकथांचे भावकाव्यांशी असलेले ऋणानुबंध दर्शविले आहेत.
समाज जीवनातील परिवर्तनाचा व्यक्तिमनावर होणारा परिणाम दर्शवणारी, मनोविश्लेषण व वास्तव दर्शन यांचा मेळ साधून सामाजिक आशय प्रकट करणारी कथा, हा कुसुमाग्रज यांच्या कथांचा महत्वाचा भाग आहे.
एका ठराविक रिंगणात कथा फिरवत न ठेवता कुसुमाग्रजांनी यांत आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही बाजूनी विविधता व नावीन्य आणले आहे.
कुसुमाग्रजांची ही व्यक्तिचित्रणे निष्ठा मानणारे आणि जपणारे असामान्य माणसे आहेत, आणि यांत पुरुष पात्रांपेक्षा स्त्री पात्रेच अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहेत, हे खास नमूद करावेसे वाटते. काव्यमय भाषाशैली हे कुसुमाग्रजांचे सामर्थ्य आहे.
"स्त्रीत्व म्हणजे मानवी जीवन सुगंधित करणारी चंदनी वाऱ्याची लहर आहे. तिला जात कसली? चंद्रप्रकाशात अंगावर घुसळणार्या वाऱ्याच्या गळ्यात कुणी जानवे घालण्याचे मनात तरी आणेल काय?" - अशा सुंदर उपमा-उत्प्रेक्षा तेच देऊ जाणोत.
कुसुमाग्रजांच्या प्रतिभेची साक्ष त्यांच्या कविता-नाटकं देतात, त्याचप्रमाणे या कथाही देतात, हेही तितकंच खरं!
Comments
Post a Comment