RIP
किती सहज झालंय हे रिप रिप (RIP) करणं..
हे असं कुठेतरी RIP लिहायचं आणि मग पुढे स्क्रोल करायचं.. मग पुढच्या पोस्ट ला laughing react केलं तरी चालेल..
वाईट वाटू शकतं, आणि कोणाचंही आयुष्य कोणासाठी थांबत नाही हेही मान्य.. परंतु श्रद्धांजली स्टेटस ला डकवण्यासाठी जी घाई गडबड केली जाते त्याने मन विषणण होतं..
सेलेब्रिटी लोकांसाठी च का, अगदी जवळच्या-घरातल्या व्यक्तीसाठी ही लगेच स्टेटस ला लावायची घाई होते लोकांना..
म्हणजे मला आठवतंय, माझें आई बाबा गेले त्याबद्दल मी कोणाला स्वतःहून काहीही कळवलं नव्हतं.
आता या घटनांना ३-५ वर्षं झालीत, परंतु माझ्यासाठी सगळं कालच घडल्यासारखं आहे. माझ्यासाठी काळ कधीचाच थांबलाय.
ज्यांनी स्वतःहून चौकशी केली, माझा खूप दिवस कॉन्टॅक्ट नाही म्हणून ज्यांनी माझी विचारपूस केली होती, त्यांना कळवलं.
ज्यांना दुसरीकडून कुठून कळलं ते बोलले, अगं तू कळवलं नाही आम्हाला!!!
मला कमाल वाटते असे प्रश्न विचारणाऱ्यांची सुद्धा. असं कोण broadcast करून सांगतं??
सांगणारे सांगतही असतील. असो, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण समाज कुठेतरी असंवेदनशील होत चाललाय याची राहून राहून खंत वाटतेय..
त्या मेलेल्या समाजाच्या मनासाठी RIP.
~ सुप्रिया घुडे
Comments
Post a Comment