गरज

 गरज


कपड्यांचं कपाट उघडलं - 'बायकांना नेहमी असं वाटतं, आपल्याकडे कपडे कमीच आहेत. जरी कपाट overflow होत असेल तरीही' - तसंच आता झालं माझं. सहज विचार आला मनात - 'खरंच आपल्याला एवढ्या साऱ्या कपड्यांची गरज आहे काय??'

असंच होतं आपलं, कधी कुठे थांबायचं तेच कळत नाही. साठवणूक करत राहतो आपण. मग ती एखादी गोष्ट/वस्तू असो, पैसे असो नाही तर माणसं. या सगळ्याच गोष्टी मोजक्याच ठेवल्या तर नाही का चालणार? तुमचं अस्तित्व संपलं की कुठे हे सगळं तुमच्यासोबत जाणार आहे? नाही कोणती वस्तू, नाही पैसे, नाही माणसं....

माझ्या आई बाबांना नव नवीन वस्तूंचा संग्रह करायची खूप हौस होती. मार्केट मध्ये आलेली प्रत्येक नवीन वस्तू/machine आमच्याकडे  असायची. गरज नसली तरी गरज निर्माण केली जायची. माझा मावस भाऊ आलेला एकदा घरी. आमच्या घरातल्या machines पाहून तो माझ्या आई ला म्हणतो - मावशी तुझाकडे जगातल्या सगळ्या मशीन्स आहेत बहुतेक 😃 

popcorns बनवायचं machine, grill sandwich/chicken बनवायचं machine,fruit juice काढायचं machine, घरघंटी, बाजारात आलेली प्रत्येक नवीन भांडी.. 

माझ्या आईच स्वयंपाक घर म्हणजे एक उत्कृष्ट museum होतं. बरं आमच्याकडे कोणी पाहुणे आले की त्यातल्या बायका, आईकडच्या वस्तू बघून अजून खुळवायच्या, त्यांना पण तसलंच काहीतरी हवं असायचं 🙄

आता आई बाबा नाहीयेत. वेळेअभावी मलाही सगळ्याच वस्तू वापरता येत नाहीत. 

आणि सगळं बघून एकसारखी त्या दोघांची आठवण येते ती वेगळी. जाणारे जातात, पण पाठी राहिलेली व्यक्ती तीळ तीळ तुटत असते 😢

मी घर घेतलं तेव्हा मलाही आई सगळं घर भरून देत होती. तिला म्हटलं नको. गरज पडेल तसं मी घेत जाईन. तशीही इथे गावच्या घरातल्यासारखी एवढी कुठे जागा असते. 

तशीही मला minimalist lifestyle खूप आवडते. तोही बदल झाला माझ्यात नोकरीला लागल्यावर. स्वतः कमवायला लागले म्हणून काही नाही, तर त्या दरम्यान सुधा मूर्ती यांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली, त्यामुळे. त्यांनी बर्याचश्या पुस्तकात लिहिलंय, त्या समाजसेवेत शिरल्या तेव्हा त्यांच्यामध्ये तो फरक पडला. त्यांचं राहणीमान पाहिलं की लगेच लक्षात येतं. 

त्यांची पुस्तकं वाचून माझ्यातही लगेच फरक पडला असंही काही नाही, 😄 पण जाणीव झाली असं म्हणता येईल.

तसंही वाचन करून माणसं सुधारली असती तर सगळं जग सुंदर झालं असतं. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कधी अक्कल येत नाही, हे खरं 😋

मला भरमसाठ शॉपिंग करायची सवय होती. कपडे, bags, चप्पल, accessories.. आणि आई ला ही सगळी आवड होतीच. पण बाबा गेल्यावर आईचा सगळा interest निघून गेला, आणि तिला बघून माझा.. तरी ती माझ्यासाठी काही ना काही घेत राहायची.. आई गेली आणि माझी हक्काची शॉपिंग पार्टनर निघून गेली..

घर घेतल्यावर ठरवलं उगाच वायफळ खर्च करायचा नाही. तसंही EMI भरल्यानंतर वायफळ खर्च करायला हातात पैसे कुठे उरायला 😀 

घर घेतलं तेही एका आदिवासी जिल्ह्यात. इथे माझ्या आयुष्यात आली माया, माझ्याकडे घरकाम करायला येणारी बाई. तिचा लेक आजारी होता म्हणून तिला तिच्या घरी सोडून आले होते एकदा. तिच्या आदिवासी पाड्यावर गेल्यावर तिथली माणसं, छोट्या छोट्या राहुट्या बघून वाटलं; कोण म्हणेल हा area मुंबई सारख्या एखाद्या श्रीमंत शहराच्या जवळ आहे??!! 

नेहमी मायाच्या गप्पांमधून तिच्या आजूबाजूची परिस्थिती डोळ्यांसमोर उभी राहायला लागली. जेवणासाठी अजूनही इथले लोकं रोज चिंबोर्या 🦀 पकडून खातात आणि दिवसाची भूक भागवतात. एखादा रोजंदारी वर कामाला जात असेल त्याच्या हातात थोडा पैसा खेळता असतो. त्यांच्या घरी तेल लावून चपात्या/पोळ्या बनत असतील काय त्या. तिचं माहेरचं घर पण एकदा पाहून आले. ते सरकारी योजनेतून बांधलेलं दिसलं. बाकी किती सवलती या आदिवासींपर्यंत खरच पोहोचत असतील देव जाणो. 

माझे आणि बहिणीचे कॉलेज पासूनचे चांगले कपडे, जे आता आम्ही 'मोठ्या' झाल्याने होत नसलेले 😀, असेच पडून होते. कोणाला तरी द्यायचे म्हणून ते राहूनच गेले. एक दिवशी माया ला विचारलं - चांगले कपडे आहेत. घेऊन जाशील का? तुमच्या शेजारी पोरींना होतील घालायला. घेऊन गेली, तिच्याच नात्यातल्या पोरींना वाटले तिने. कपडे आणले म्हणून माया तिथे भाव खाऊन गेली 😎  

मग त्यांना आवडतंय म्हटल्यावर बरचसं कपाट आम्ही रिकामी केलं. उगाच काही कपडे ठेवलेले असतात, घालू घालू म्हणतो आणि मग कपडे आटलेले असतात 😋(आपण जाड नाही होत, कपडे आटले म्हणायचे 😜). मग देऊन टाकले असे कपडे.

आईने एक सवय घालून दिली आहे मला. दर नवरात्रीत एका देवीची आणि ओळखीतल्या एका स्त्री ची ओटी भरायची. इथे राहायला आल्यावर इथली ग्रामदेवता चण्डिका देवी आणि स्त्री शक्ती म्हणून माया, आयत्याच भेटल्या मला 😇 

मग काय, दर वर्षी माया ची साडी चोळी ने ओटी भरते. ती मग ज्या ज्या घरात कामाला जाते, तिथे कौतुकाने सांगणार - 'ताईंनी मला साडी दिली' 😍

मग त्या बायका मला येऊन बडबडणार - 'खूप दया येते तुला मायाची, लाडावून ठेवलंयस तिला' 😃😄

असो, भरलेल्याला खायला देण्यापेक्षा, भुकेल्याला खायला दिलेलं कधीही चांगलं, असं मला वाटतं.

नाहीतर उगाच इथे तिथे देण्यापेक्षा सत्पात्री दान दिलेलं कधी चांगलं.

आता स्वतःच्या गरजांना लगाम घालायला आणि दुसऱ्यांच्या गरजा ओळखायला शिकतेय मी हळू हळू 😇😊

lockdown च्या आधी पुन्हा एक पिशवी कपड्यांची बाजूला ठेवली होती, म्हटलं - 'माया, तेवढे कपडे जाताना घेऊन जा, द्या कोणाला हवे असतील त्यांना'.

माया - 'हो, हल्लीच त्या पोरी मला विचारात होत्या, काकी बरेच दिवस झाले तू आमच्यासाठी कपडे नाही आणले' 😊😊😊😊😊

~ सुप्रिया घुडे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर