काळेपाणी ~ स्वातंत्र्यवीर सावरकर

 काळेपाणी ~ स्वातंत्र्यवीर सावरकर





'मला काय त्याचे' अथवा 'मोपल्यांचे बंड' या पहिल्या कादंबरी नंतर सावरकरांनी 'माझी जन्मठेप' हा आपल्या आत्मचरित्राचा भाग लिहिला होता. ह्या आत्मचरित्रात अंदमानात काळ्या पाण्यावर सश्रम कारावासाची भयानक शिक्षा भोगणार्या राजबंद्यांचे जीवन दिलेले आहे. औट घटकेचे टीचभर हिंदू राज्य ही संकल्पना 'माझी जन्मठेप' मध्ये आलेली आहे. ह्या पुस्तकाचे गुजराती भाषांतर झाल्यानंतर काही राजकारण्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांकडे 'माझी जन्मठेप' पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. त्याप्रमाणे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी 'माझी जन्मठेप' पुस्तकावर दि. १७ एप्रिल १९३४ ला बंदी घातली. म्हणून सावरकरांनी 'काळे पाणी' ही दुसरी कादंबरी लिहिली. यात त्यांनी अंदमानच्या बंदीगृहातील अत्यंत कष्टकारक, तापदायक, अमानुष गुंडगिरीचे जीवन कसे जगावे लागते होते, ते दर्शविले आहे. हे कथानक एका बंदिवानाच्या न्यायालयातील अभियोगावर आधारलेले आहे. रफीउद्दीन, योगानंद, मालती आदि नावे काल्पनिक असली तरी त्या अभियोगांतील मूळच्या नावाशी   मिळतीजुळती च आहेत. सुप्रसिद्ध गायक आणि चित्रपट निर्माते  श्री. सुधीर फडके यांनी या कादंबरीवर चित्रपट काढण्याचे ठरविले होते. पण नियंत्रक मंडळाने त्यांतील रफीउद्दीन हे मुसलमानी नाव बदलण्याची अट घातली. परंतु सावरकरांनी निक्षून सांगितले की मुसलमानी नाव काढून हिंदू नाव घालण्यास माझी संमती नाही. 

अशी माहिती प्रस्तावनेत बाळ सावरकर देतात.

या कादंबरीत सावरकरांनी अंदमान आणि तेथील आदिवासी लोकं याबद्दल बरीच विस्तृत माहिती दिली आहे.  

अंदमान जंगली जाती नेहमी आग सोबत बाळगतात, ती विझू देत नाहीत, जसे हिंदू/पारशी अखंड अग्निहोत्र पाळतात. अंदमानातील जंगलात ते गरजेचेच आहे म्हणा. कारण त्या घनदाट अरण्यात विषारी डास, माश्या, साप, जळवांचा सुळसुळाट. त्यात आगपेटी नसल्याने, आग विझली तर पुन्हा गारगोटी पाडून ठिणगी पाडायची, त्यामुळे एकदा पेटलेली आग शक्यतो अखंड पेटत ठेवणे सोयीस्कर. त्यावरूनच आर्यांमध्ये सुद्धा अखंड अग्निहोत्राची प्रथा कशी पडली असावी त्याबद्दल सावरकर म्हणतात -

 उत्तर ध्रुवासारख्या थंड प्रदेशात उष्णतेसाठी आगीचे अखंड सन्निध्य आवश्यक भासले असणार. त्याकाळी सुद्धा आगपेटी नसल्याने लाकडाने किंवा गारगोटीने एकदा आग पेटवल्यावर पुन्हा ती विझू न देण्यासाठी ती भडकती ठेवणे अपरिहार्य वाटले असेल. त्यामुळेच उत्तर ध्रुवाकडील आर्यात अग्निप्रस्थ वाढले आणि त्याला पुढे सदाचाराचे मग धर्मकर्तव्याचे रुप येऊन अग्निहोत्र संस्था बनली.

काही अट्टल दंडित स्वतःच्या गळ्यात 'खोबणी' तयार करतात. अत्यंत निर्ढावलेले अपराधी गुरुपरंपरेने या विद्येत पटाईत होतात. त्याबद्दल सावरकर सांगतात -

पशु रवंथ करण्यासाठी गळ्याच्या ज्या पोकळीत चर्वण साठवून ठेवतात, ती पोकळी मनुष्यालाही आपल्या त्याच जागी करून घेता येते. तोंडात एक शिशाची गोळी, तिला मांस जाळतं एक रसायन लावून ते ठेवतात. ती गळ्याच्या कानाच्या बाजूला रुतेल अशा बेताने बरेच दिवस राहिली की भाराने मांसात उतरत त्या पोकळीला भोक पाडत आत जाते. ज्यांना नाही जमतं त्यांना चवली-पावली राहील इतपत उथळ भोक पडतं. ज्यांना जमतं त्यांना मोठं भोक पाडता येतं. या खोबणीत त्या अपराध्याना बऱ्याच गोष्टी लपवून ठेवता येतात. अगदी पैसे, तपकीर वगैरे. गारुडी काही खेळात तोंडातुन निरनिराळ्या वस्तू काढून दाखवतात, ते याच पोकळीत साठवलेल्या असतात. उलटी करून त्या वस्तू वर येऊ न देता पटाईत दंडीत त्या अडवू शकतात. परंतु स्नायू थकले तर दाबासरशी त्या वस्तू बाहेर पडू शकतात.

अंदमानात काळ्या पाण्याचे बंदिवान आणले जातात, त्या काळी ज्या कक्षागृहात प्रथमतः कोंडले जात, तेथे ज्याच्या त्याच्या वर्गवारी प्रमाणे प्रथम दंडीत आणि न्यूनापराधी यांना, वर्तणूक चांगली राहिल्यास बहुधा सहा महिन्यांनी कारागृहाबाहेर सोडण्यात येई.  जे निर्ढावलेले दंडीत असत, त्यांना अपराध भीषणतेच्या आणि वर्तवणुकीच्या मानाने एक ते पाच वर्षांनी कारागृहाबाहेर सोडण्यात येई.

अशी बरीच माहिती कथानक चालू असताना सावरकरांनी दिली आहे. महत्वाचं म्हणजे कादंबरीतील शुद्ध मराठी भाषा. एवढी शुद्ध भाषा अजून तरी मी कुठे वाचली नाहीये. आपण रोजच्या वापरात कितीतरी इंग्रजी/हिंदी/उर्दू  मिश्रित शब्द सहज वापरतो त्याला मराठी शब्द आपल्याला माहितही नसतात. 

त्यातल्या त्यात मला आवडलेले शब्द आणि त्याचे अर्थ मी खाली देतेय 😁 -

ट्रान्सफर सीन - आकस्मित दृश्यपालट

जेलर - बंदिपाल

कबुलीजबाब - स्वीकारोक्ती

फाउंटन पेन - अखंड टाक

हॅन्ड बॅटरी - हातचमक

इंजेक्शन - टोचे

Law-abiding - निर्बंधशील

war ships - रणतरी

आरमार - नौसाधने

Cellular Jail - कक्ष कारागार

जबाबदारी - दायित्व

जबाबदार - उत्तरदायी

film - चित्रावली

urgent - त्वर्य

Apprentice Compounder - शिकाऊ श्रमिकांत

pioneer - पुरस्सर

सावरकरांनी मराठी भाषेला नव्या शब्दांची देणगी दिली. त्याचप्रमाणे जुनेच; पण नव्याने प्रचारात आणलेले काही प्रतिशब्द दिले. 

आता हे मराठी शब्द नेहमीच्या बोलण्यात वापरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा विचार केला आहे आम्ही 😊😊

रत्नागिरीच्या स्थानबद्ध्तेच्या काळात अस्पृश्योद्धाराच्या कार्यासोबतच सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ जोमाने चालवली होती.

तर.. 'काळे पाणी' चे कथानक छान आहेच परंतु मला त्यांनी तेथील 'जावरा' या आदिवासी जमातीबद्दल इत्यंभूत दिलेली माहिती जास्त आवडली. अर्थात प्रत्येक वाचकाचा एखादं पुस्तक वाचनाचा perspective 😋 दृष्टीकोन वेगवेगळा असतो म्हणा ☺️

स्वातंत्र्य काळातील आपले राजबंदी जसे सावरकरांनी अंदमान ला किंवा टिळकांनी मंडाले ला किती खडतर सश्रम कारावास भोगला असेल, हे वाचायचे असेल तर 'काळेपाणी' आवर्जून वाचावे.

~ सुप्रिया घुडे

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर