❇कोकण
🔱कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे. तांदूळ आणि नारळ हि कोकणातील महत्त्वाची पीकं ! त्यामुळे या दोन्हींचा कोकणी पदार्थात सढळ हस्ताने वापर होतो. तर अशा या दोन घटकांचा वापर करून मी बनवला आहे
- नारळी भात. हा मुख्यत्वे श्रावणात नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधन ला बनवला जातो. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून, नारळ देऊन मासेमारीला परत सुरूवात होते. आणि नैवेद्य म्हणून देवाला नारळी भात दाखवला जातो.
🔱कुळीथ पिठी. सिंधुदुर्गात याला "पिठलं" असं न संबोधता "पिठी" असं संबोधलं जातं. :)
कोकणांतली लोकं खाण्याच्या बाबतीत अजिबात बडेजाव न करता जे पेज-भाकरी-पिठी असेल त्यात पोट भरून तृप्त असतात.
त्यातलाच एक घराघरात सहज उपलब्ध असलेला, सहज बनणारा पदार्थ म्हणजे - कुळथाची पिठी.
कुळीथ (अथवा हुलगा) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे कडधान्य आहे.
पीक काढणीला वेळ झाल्यास कुळीथ(हुलगा) टरफल फुटून बाहेर सांडतो आणि शेतात विखुरतो, परिणामी नुकसान होते. त्यामुळे हे कडधान्य जवळजवळ नामशेष झाले आहे.
कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते. कुळीथामुळे वात व कफ कमी होतो. कुळीथ मुतखड्यावर औषधाप्रमाणे काम करतात. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात.
🔱उकडीचे मोदक
मोदक हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रत्येक घरात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चौथ्या तिथीला म्हणजेच गणेश चतुर्थीला गणेशाची मूर्ती स्थापन करून गणपती बाप्पाला मोदक प्रसाद म्हणून बनवण्याची पद्धत आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला सुद्धा गणेशासाठी प्रसाद म्हणून मोदक बनवले जातात.
❇पश्चिम महाराष्ट्र
🔱झिरकं - नाशिक ची खासियत. त्यात शेंगदाणे आणि तिळाचा मुख्यत्वे वापर केला जातो.
🔱 पेढा हा खवा आणि साखर यापासून बनलेली दंडगोलाकार आकाराची मिठाई आहे.
पश्चिम महाराष्ट्रातले वेगवेगळ्या ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात म्हणून "कंदी पेढे" तर कोल्हापूरचे पेढे हे "फिके पेढे" (तुलनेने मध्यम गोड) म्हणून प्रसिद्ध आहेत. पुण्यामधे काका हलवाई, "चितळे बंधू", कोल्हापुरात "दगडू बाळा भोसले" हे पेढ्यांसाठी प्रसिद्ध आहेत.
मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस टिकतो.
🔱 लाटी वडी ही अतिशय पारंपरिक रेसिपी आहे. पश्चिम महाराष्ट्रा मध्ये विशेषतः सांगली मध्ये ही वडी खुप प्रचलित आहे.
🔱 सोलापुरची शेंगदाणा चटणी हि खासच. मूळ सोलापूरी शेंगदाणे आकाराने मोठे अन तेलाचे प्रमाण जास्ती असणारे असतात. इतरत्र मिळणार्या शेंगदाण्यांना तेव्हढे तेल सुटत नाही. त्यासाठी आपल्याला थोडा जुगाड करावा लागतो मग ;)
❇विदर्भ
🔱 शेवग्याच्या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह असतं त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. त्यामुळे बाजारात शेंगा दिसल्या कि हमखास आमच्याकडे शेगलाची (कोकणातला शब्द :)) भाजी करतात. पहिल्यांदाच विदर्भ पद्धतीने बनवली आहे :)
🔱 नागपुरी गोळे भात
🔱 भरडा भात
विदर्भातील भंडारा,गडचिरोली,गोंदिया भागात हा भरडा भात मुख्यत्वे केला जातॊ. या भागांत तांदळाचं पीक मोठ्या प्रमाणात होतं; त्यामुळे इथं भाताचे विविध प्रकार पाहायला मिळतात. भातापासून आंबवलेल्या पेजेचा प्रकार इथं केला जातो. तो प्रकार प्यायला की एक प्रकारची नशा येते आणि त्यामुळे कामसुद्धा चपळाईनं होतं. म्हणून इथला बहुतांश मजूरवर्ग अशा प्रकारची पेज बनवून तिचं सेवन करत असतो.
🔱 छेना(पनीर)-संत्रा बॉल्स(बर्फी).
नागपूरची संत्री आणि तिथली संत्र्याची बर्फी तर खासच. त्याच संत्रा बर्फीचं एक वेगळं version मी सादर करत आहे. :)
❇ खान्देश
🔱 खान्देशी फौजदारी डाळ
🔱 जळगावी वांग्याचं भरीत.
यासाठी खास जळगावी हिरवी वांगी वापरली जातात आणि कांद्याच्या पातीचा वापर केला जातो. सध्या lockdown मुळे मला कांद्याची पाट मिळाली नाही म्हणून ती वापरली नाहीयेत.
🔱 डाळ गंडोरी
🔱 खान्देशी खिचडी
❇ मराठवाडा
🔱 गव्हाची खीर करण्यात मेहनत आणि वेळ बरीच लागते. Patience ची परीक्षा होते :D
🔱 मराठवाड्यातील भुरका.
झटपट होणारा भुरका हा तोंडीलावण्याचा एक प्रकार आहे. भुरका हा तिखटच असतो. जेवताना घरात लोणचं, चटणी, ठेचा असं काही नसलं की पटकन भुरका केला की काम भागतं. चटणीला ऑपशन म्हणून झणझणीत भुरका ताटाची डावी बाजू सांभाळायला तयार असतो. :)
🔱 दहित्री.
याची चव नुसती सुद्धा छान लागते आणि पाकात बुडवले कि अहाहा.. जन्नत :)
🔱 पुरणाचे दिंड.
मराठवाड्यात नागपंचमी ला केला जाणारा हा पदार्थ. या दिवशी काही चिरायचं / कापायचं नसतं म्ह्णून. कोकणात कश्या नाग पंचमीला पातोळ्या करतात तसे मराठवाड्यात पुरणाचे दिंड.
❇ जत्रा फूड
🔱 जवळा / कोलीम पाव
मालवणी जत्रा म्हणलं कि त्यात कोकणी पदार्थ आलेच. मला मालवणी जत्रेत गेल्यावर तिथला जवळा पाव नाही खाल्ला कि बेचैन होतं :-P
🔱 पोहा चिकन भुजिंग
दरवर्षी केळवे ला बीच महोत्सव असतो. कोणी मुंबई किंवा जवळपास राहणार असेल तर आवर्जून भेट द्यावी असं आयोजन असतं. २-३ दिवस विविध पदार्थांची आणि कार्यक्रमांची रेलचेल असते. अगदी पारंपरिक पासून मॉडर्न. आदिवासींचं तारपा नृत्य तर मस्तच :) तिथे जाऊन विरार आगाशीचं फेमस पोहा चिकन भुजिंग न खाता घरी परतणं म्हणजे मोठी चूक :-P
❇ लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र
🔱 "उपजे".
जुन्या काळी घरी साळीचे तांदूळ बनवत तेव्हा शेवटी कण्या राहायच्या. या कण्या वापरायच्या कुठे? टाकून देणं तर आपल्या संस्कृतीत नाही. मग त्यांपासून हा एक पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ बनवला जायचा. आता तुकडा तांदूळ वापरून हे उपजे बनवू शकतो आपण.
🔱 "कोळाचे पोहे".
सुट्टीत सगळे एकत्र जमले की भेळ, पाणीपुरी असले चटपटीत पदार्थांची रेलचेल असते. जुन्या काळी हे पदार्थ असे सहज मिळत नव्हते. मग तेव्हा आजी नातवंडांना घरातले पदार्थ वापरून चमचमीत असे काही करून खायला द्यायची. त्यातलाच हा एक "कोळाचे पोहे".
🔱 "आंबवलेल्या खापरोळ्या".
ज्या काळी इडली उत्तप्याच साम्राज्य कोकणात पसरलं नव्हतं तेव्हा डाळ-तांदूळ-गूळ-खोबरं-पोहे हे महत्वाचे घटक वापरत खापरोळी हा आंबवलेला पदार्थ दर रविवारी ठरलेला असायचा. आता तयार इडली पीठ जागोजागी दुकानातून मिळतंय, या खापरोळ्या साठी मेहनत कोण घेत बसणार. त्यामुळे खवैये सोडून इतर ठिकाणी पुन्हा या इतिहासजमा होत जातील...
🔱 "समारं"
❇ स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र
🔱 "कांदे पोहे"
पोहे म्हटलं की मला पुण्यातल्या 'बिपीन' चे कांदे पोहे आठवतात. इथे मुंबई ला आल्यावर सुद्धा, घर एकीकडे आणि नोकरी दुसरीकडे. प्रवासात ३ तास गेले. घरून नाष्टा करून निघायला जमेलच असं नाही. अशा वेळी आमच्या ऑफिस जवळ एक काका मस्त नाष्टा बनवतात, त्यांचे कांदे पोहे नेहमी तारणहार ठरतात त्यामुळे तसं पाहिलं तर पोह्यांशी माझी ओळख घरा पेक्षा घरा बाहेरच
🔱 भुर्जी पाव Non-vegetarian & Ovo-vegetarian लोकांचं आवडतं street food आहे. सध्या आम्हाला घरी असंच बनवून खायची चटक लागलेली आहे
🔱 "मिसळ पाव".
ही आमची फॅमिली डिश म्हणतो आम्ही अगदी पिढीजात.. गौरी-गणपतीला सर्व एकत्र जमले की सकाळी नाष्टा बनवायला वेळ नसतो बायकांना, दुपारच्या जेवणाचीच डायरेक्ट तयारी सुरू होते. मग मिसळ आणि वडा पाव पार्सल आणला जातो. सकाळी यथेच्छ सह - नाष्टा होऊन पुढील दिवसाची सुरुवात होते आमची शिमग्यात आमच्याकडे पहाटे पालखी येते. देव भेटून गेला की आमची स्वारी "रसराज" किंवा "गोपाळ" कडे वळते तिथे मिसळपाव ठरलेला. मी महाराष्ट्र मधल्या ज्या ज्या भागांत राहिले आहे(सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी, मुंबई) त्या सगळ्यांची थोडी थोडी style कॉपी करत आजची मिसळ पाव बनवली आहे. गोड मानून घ्यावी
अगदी पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत पूर्ण कोकणात वडा पाव खूप प्रसिद्ध आहे. त्यातकरून मुंबई लोकल मध्ये घाईगडबडीत उभ्या उभ्या खाण्यासाठी ही मस्त पोटभरू गोष्ट. वडापाव मध्ये लसूण आणि धणे असतील तर बनवणारा (आचारी) मराठी आहे समजायचं.
तर २ महिन्यात जवळपास ३० पदार्थ बनवलेत.
~ सुप्रिया घुडे
Comments
Post a Comment