रोझलिंड फ्रँकलिन - द डार्क लेडी ऑफ डी एन ए

रोझलिंड फ्रँकलिन - द डार्क लेडी ऑफ डी एन ए
अनुवाद - वीणा गवाणकर



प्रगत समजल्या जाणाऱ्या अमेरिकेत काय किंवा युरोपीय देशांत काय, स्त्रियांसाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडले गेल्यावर त्यांना पुरुषांच्या बरोबरीनं समान हक्क, समान संधी मिळाल्या असं नाही. अगदी आतापर्यंत स्त्रियांना त्यासाठी झगडावं लागलंय. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत तरी हा झगडा तीव्र जीवघेणा कसोटी पाहणाराच होता. विज्ञान क्षेत्रात - विशेषतः गणित आणि भौतिकी - 'पुरुषवर्गाची'च मक्तेदारी होती. गणिती, भौतिकाच्या अभ्यासाने, संशोधनाने स्त्रिया पुरुषी होतात, अशी त्यावेळची सामाजिक धारणा. अशा वेळी स्वतःला शास्त्रज्ञ म्हणून सिद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञ स्त्रियांना अथक मेहनत घ्यावी लागली. अनेकींच्या बाबतीत तर त्यांचं संशोधन त्यांच्या मालकीचं न ठरता त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांच्या किंवा विभाग प्रमुखांच्या मालकीचं ठरलं; त्यामुळे काहीजणी उच्च श्रेणीच्या पुरस्कारांना मुकल्या.

त्यातलीच एक - रोझलिंड फ्रँकलिन (१९२०-१९५८)
कोळसा, DNA, RNA, विषाणू या क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय दर्जाची संशोधक. विज्ञान - जगतापलिकडे ती फारशी कुणाला माहीत नव्हती. डॉ वॉटसन नि 'द डबल हेलिक्स' मध्ये केलेल्या तिच्या वादग्रस्त चित्रणामुळे ती चर्चेत आली.. आणि तिची खरी योग्यता जगासमोर आली.

डॉ जेम्स वॉटसन (१९२८) आणि डॉ फ्रान्सिस क्रीक (१९१६ - २००४)
हे दोघेही अत्यंत बुद्धिमान संशोधक. DNA रहस्य उलगडण्याचा शर्यतीत त्यांना डॉ लायसन पाऊलिंग यांच्यावर मात करायची होती.
[डॉ लायसन पाऊलिंग (१९०१-१९९४) जागतिक कीर्तीचे रसायन शास्त्रज्ञ. प्रथिनांच्या रेणू-रचनेचा शोध लावल्यावर DNA  रेणू- रचनेचा शोध लावण्यास अधीर झालेले.]
डॉ जेम्स वॉटसन आणि डॉ फ्रान्सिस क्रीक यांनी रोझलिंडचे प्रयोगसिद्ध पुरावे आणि इतर समकालीन संशोधकांचे आयते संशोधन वापरून, अल्पावधीत DNA मॉडेल उभारण्यात त्यांनी यश मिळवलं.

डॉ मारिस विलकिन्स (१९१६-२००४)
रोझलिंड चे सहकारी संशोधक. पण या  दोघांत नेहमीच तेढ राहिली. त्यांनी तिच्या नकळत तिचे संशोधन वॉटसन-क्रीक ना देऊन त्यांच्या DNA मॉडेल उभारणीला मोलाची मदत केली.

वॉटसन-क्रीक-विलकिन्स यांना १९६२ साली त्रिभागून नोबल पुरस्कार मिळाला.

बौद्धिक - विशेषतः वैज्ञानिक क्षेत्रात - स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक काटेकोरपणे, कठोरपणे तपासली जाते, आणि मिळवलेल्या यशाच्या मनाने कमी गौरविली जाते.

रोझलिंड ची मेहनत तिच्यासमोर दुसऱ्याच्या हातात गेली. हे पण कमी होतं की १९५६ मध्ये अमेरिका दौऱ्यावर असताना, कपडे घालत असताना तिच्या लक्षात आलं, आपल्या स्कर्ट ची झिप वर खेचताना अडचण होतेय. अचानक पोटाचा आकार कसा वाढला, ती चक्रावली. वैद्यकीय तपासणी अंती चार सप्टेंबर रोजी तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. Ovarian Cancer च निदान होऊन २ tumors निघाले. १ महिन्यानंतर गर्भाशय आणि एक ovary काढावी लागली, हा आजार तिचा हळू हळू घास घेत होता.
पण हॉस्पिटल वाऱ्या चालू असतानाही तीच संशोधन आणि शास्त्रीय संशोधनात्मक लेख लिहिणं चालू होतं.
तिच्या संशोधनाचा, लेख लिहिण्याचा, मॉडेल घडवण्याचा झपाटा पाहता तिला मरायलाही फुरसत नव्हती बहुतेक.

पुरुषांच्या क्षेत्रात स्वतःचं स्थान मिळवण्यासाठी आणि ते राखण्यासाठी रोझलिंड अंत:प्रेरणेपेक्षा प्रयोगसिद्ध निष्कर्षांवर अधिक विसंबून होती. तिचं संशोधनातलं सातत्य, स्वतःला प्रयोगशाळेत गाडून घेणं, तिच्या कामाचा झपाटा तिच्या सहकार्यांना थक्क करी. तिच्या उण्यापुर्या अडतीस वर्षांच्या आयुष्यात तिने कार्बन, DNA आणि विषाणू या विषयांवर एकूण ३७ विज्ञानलेख सादर केले. त्यातले काही स्वतंत्र तर होते, काहींत सहलेखक होते. ते सर्व लेख विज्ञानक्षेत्रात मोलाचे मानले जातात.

मरणाच्या दारात असताना तिला भेटायला आलेल्याना ती धीर देत होती, आणि आपण लवकरच यातून बऱ्या होऊ असं म्हणत होती. या आजारामुळे आपण हाती घेतलेलं संशोधनाचं काम मागे पडतंय याच तिला राहून राहून वाईट वाटे.

DNA शोधाच्या ५०व्या वाढदिवशी ठिकठिकाणी मोठमोठे समारंभ झाले. त्यातल्या बहुतेक मोठ्या समारंभात वॉटसन जातीने हजर होते. जणू काही तो त्यांचा एकट्याचाच शोध होता, असे ते वावरले.
डॉ क्रीक नि मात्र हे प्रदर्शन टाळलं. DNA शोध हा केवळ वॉटसन-क्रीक चा नसून इतर अनेक शास्त्रज्ञांचा हातभार त्याला लागलेला आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं. परंतु त्यांनीही रोझलिंड चा उल्लेख करणं कटाक्षाने टाळलं.

अगदी अलीकडची घटना. वॉटसन यांनी एका व्याख्यानात आपण 'DNA रेणू-रचनेचा शोध' कसा लावला याचा तपशील देत इतिहास सांगितला. व्याख्यान संपल्यावर प्रश्नोत्तराच्या वेळी एकीने त्यांना प्रश्न विचारला -
"डॉ वॉटसन, डॉ रोझलिंड फ्रँकलिन च्या DNA शोधातील योगदानाविषयी जरा अधिक विस्ताराने सांगाल का?"
हा प्रश्न विचारला जाताच प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
असंच एकदा मुलाखतकाराने छेडलं असता डॉ वॉटसन बोलले होते -
"रोझलिंड हा माझ्या खांद्यावरचा क्रॉस आहे. मी तो वाहीन. मला वाटतं ती विक्षिप्त(autistic) होती. आत्यंतिक बुद्धिमान व्यक्तीत आढळणारा विक्षिप्त पणा तिच्यात होता..."

पण आपल्या योग्यतेची, क्षमतेची उचित कदर केली जात नाही, म्हणून रोझलिंड नेहमी लढाऊ पवित्र्यात असे. आपल्याला 'निखळ शास्त्रज्ञ' म्हणून ओळखलं जावं, हीच तिची इच्छा होती.

ते काहीही असो.. वॉटसन च्या खांद्यावर रोझलिंड चा क्रुस आहे आणि तो त्यांना जन्मभर वाहावा लागणार, हे खरं.

ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड असेल त्यांना हे पुस्तक वाचताना बऱ्याच गोष्टींची लिंक लागेल. अकरावी - बारावी ला DNA अभ्यासताना ते वॉटसन - क्रीक च मॉडेल समजूनच अभ्यास केला याचा आता राग येतोय.

विज्ञानाबाबत प्रादेशिक सीमा ओलांडलेली, पर्वतारोहणाचा ध्यास असलेली, कॅन्सरशी निकराने लढा देणारी खंबीर तरुणी रोझलिंड च्या रूपानं भेटते... आणि मग केवळ स्त्रियांसाठी नव्हे तर अवघ्या विज्ञान जगातला ती आदर्श ठरते. DNA संशोधनातल्या योगदानाचे तिचं श्रेय हडपलं जाऊनही ती चार अंगुळ वर उरते.

१६ एप्रिल १९५८ - दुपारी रोझलिंड ने कायमचे डोळे मिटले.
तिच्या कबरीच्या शिळेवर लिहिलंय -
'शात्रज्ञ : तिचं विषाणू वरच संशोधन मानव जातीच्या चिरंतन हितासाठी होतं'.
⚗️🔬👩‍🔬

~ सुप्रिया घुडे

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर