आस्तिक ~ नास्तिक

आस्तिक ~ नास्तिक



संध्याकाळी दिवे लावण्याची पूर्वापार परंपरा आहे. पुढच्या दारी लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक, तुळशी पाशी एक आणि मागल्या दारी अवदसा येऊ नये म्हणून एक.. का बरं सुरू केली असेल ही प्रथा..
संध्याकाळची कातरवेळ.. धड दिवस नाही, धड रात्र नाही.. अशी संधीप्रकाशाची वेळ खरं तर पहाटे पण असते, पण संध्याकाळचा तो मनाचा जडावलेपणा पहाटे नाही जाणवत.. संध्याकाळ होत आली की आसमंतात उरून राहते ती एकांतातील अनामिक हुरहूर.. ती मरगळ घालवण्यासाठी दिवेलागणीची प्रथा सुरू झाली असावी.. आणि एखादी गोष्ट धार्मिकतेशी जोडली की लगेच पचनी पडते..
संध्याकाळची घरी असेन तर मी पण लावते दिवे..
लहानपणापासून घरातल्या बायकांना पाहत आल्यामुळे अंगवळणी पडलं असेल, कदाचित.
आवड आहे, असंही काही नाही. देवासाठी लावते, अशातलाही काही भाग नाही. कदाचित सवय.. खर तर आई गेल्यावर घरातल्या सगळ्या देवाचं विसर्जन करणार होते मी, पण नाही केलं, का नाही केलं, माहीत नाही.
बाबा गेल्यावर आई सुद्धा यंत्रवत देवाची पूजा करायची, दोष देत बसायची (देवाला की नशिबाला, कोण जाणे!), पण तिनेही पूजा नाही सोडली, का नाही सोडली, माहीत नाही.
दीड वर्ष झालं तिला जाऊन, आईने बनवलेल्या वाती मी वापरते घरी गेले की. तिने बिचारीने तेव्हा विचारही असा केला नसेल, की या वाती आपल्या मागाहून वापरल्या जातील...
आज तुपाच्या वाती बनवताना आजीची (उषाताई ची, हो आम्ही आजीला ताई म्हणतो, सगळीच उलटी गंगा) आठवण होते. ती अशा तुपाच्या वाती बनवून ठेवायची. मी रत्नागिरी ला असेन तेव्हा गुरुवारी मी तिच्यासोबत वाडीतल्या दत्त मंदिरात जायचे. घेऊन जायचो आम्ही मंदिरात तो तुपाचा दिवा आणि स्वस्तिक च्या (पांढऱ्या) फुलांचा हार, मला हार बनवायला खूप आवडायचं, आई ने बरंच काही शिकवलं होतं..
उषाताई खूपच देव देव करायची. तशी मला पण सवय लागली होती, पण आता सगळं बंद. पण उषाताई एवढं धार्मिक मी कोणालाही पाहिलं नव्हतं. काय झालं पण एवढं देव देव करून. असं म्हणतात, आई वडिलांना आपल्या मुलांचं मरण पाहायला लागू नये. पण तिने आपल्या दोन्ही मुलांची मरणं स्वतःच्या डोळ्यांनी पहिली, आणि मग डोळे मिटले..
का आठवतंय सगळं आज मला.. ही कातरवेळ असतेच अशी, म्हणायला एकलेपणा. आणि अशी रिकामी जागा दिसली की सगळी विचारांची - आठवणींची गर्दी अचानक ती रिकामी जागा व्यापायला सुरुवात करते. ते नाही का, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की लागलीच चक्रीवादळ सुरू होतं, तसलच हे - आठवणींचं चक्रीवादळ.
आता या क्षणाला मी या निर्णयापर्यंत तरी पोचलेय, की देव ही फक्त एक संकल्पना आहे. वचक ठेवण्यासाठी (देवाला तरी घाबर!) किंवा थकलेल्या मनाला उभारी आणण्यासाठी (देव भलं करेल!). आणि जर तुम्ही मनाने strong असाल तर या संकल्पेनेचीही तुम्हाला गरज नाही.

'आहे मनोहर तरी' मधील सुनीता देशपांडे यांनी काही वाक्य आठवतात मला -
'... पुढे कधीतरी मी नास्तिक होत गेले आणि पक्की नास्तिक झाल्यावर त्याचा अभिमानही बाळगू लागले. आजही मी नास्तिकच आहे, अगदी पक्कीच. पण आज वाटते, नास्तिकय ही अभिमान वाटण्यासारखी गोष्ट असली तरी त्यात मनःशांती मात्र नसते. अस्तिकय हे बिनबुडाचे असते खरे, पण त्या अज्ञानात सुख नक्कीच असते. इथे सुखाचा अर्थ स्थैर्य, आधार, शांती, असाही असेल. त्यामुळे मला माझ्या नास्तिक्याचा अभिमान असला तरी अस्तिकांचा हेवा वाटतो. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की आस्तिक माणूस हा विचारांती पुढे नास्तिक होऊ शकतो, पण खरा नास्तिक हा आस्तिक कधीच होऊ शकत नाही.'

~~~~~~~~~~~~~~~~

आता तर देवाचाही बाजार मांडून ठेवलाय. आमच्या देवाची भक्ती करा, तो तुमचा उद्धार करेल. अरे मी म्हणते का म्हणून, तुमच्या संकल्पना दुसऱ्यावर लादाव्यात???
काही दिवसांपूर्वीची गोष्ट, ऑफिस मधून घरी जायला निघाले, आधीच तब्येत down झाली होती, सर्दीने बेजार, ट्रेन मिळेल की नाही याचं टेन्शन कारण अगदीच वेळेवर निघाले होते, वैताग थोबाडावर सरळ दिसत च असेल माझ्या, त्यात 2 मुली समोर येऊन उभ्या राहिल्या. लहान कॉलेज मधल्याच वाटत होत्या.
एक मुलगी - "excuse me, आप christian हो क्या?"
मी - No
मुलगी - "आप येशू को मानते हो?"
मी - No
माझी अशी neutral reaction त्यांना अपेक्षित नसावी. त्या बिचाऱ्या दोघीना काय बोलावं, तेही कळेना. मीच OK बोलून काढता पाय घेतला.
माझ्या चेहऱ्यावरून मी काही रंजलेली - गांजलेली वाटते की काय, काय माहीत. पण या आधी पण मला अशी बरीच लोकं भेटलेली आहेत मुंबईत. आणि 'ही लोकं' असेच आयुष्यात सोसलेले victims शोधत असतात, हे मी ऐकून होते मुंबईत आल्यावर.
मी घाईत होते म्हणून (तशी मी कधी घाईत नसते म्हणा), पण फुरसत मध्ये अशी लोकं मिळाली माझा तावडीत तर असं brainwash करेन की कोणालाही मानायचं बंद करतील.
एवढ्या तरुण पोरी, पण career कडे लक्ष देण्या ऐवजी या धर्माच्या बाजारात आणून सोडलंय त्यांना, याच जास्त वाईट वाटतं..
 त्या आधी 2 दिवस अशीच एक बाई parking मध्ये भेटली. तिच्या सोबतची तिची मैत्रीण जोर जोरात मोबाईल वर बोलत होती, बराच काहीतरी प्रॉब्लेम झालेला वाटत होता. मी रेनकोट घालायला सुरुवात केली, पाऊस सुरू होत होता. त्या बाईला काय वाटलं कोण जाणे माझ्याशी बोलायला सुरुवात केली -
"excuse me, क्या मैं आपसे 2 mnts  के लिये बात कर सकती हूं?"
"हा बोलिये"
माझ्याकडे एक visiting card देत - "आपको जब time मिले तब ये website जरूर visit कर लिजीएगा"
मी रेनकोट घालत - "क्या है इस website पे?"
"आप देख लिजीएगा, आपको जब time मिले" - पुन्हा card समोर धरत..
मी तरीही card हातात न घेता - "अरे क्या हैं वो तो बतायेगी आप?" - एक तर तिच्या मैत्रिणीचा काय प्रॉब्लेम झालेला काय माहीत, मोठयाने फोनवर बोलून आमचे कान गेले होते.
"आप आपके life से जुडे कोनसे भी सवाल, कोनसे भी problems इस website पे पुछ सकते हो, तुरंत जवाब मिल जायेंगे"
आता तिच्या मैत्रिणीसारखी मोठयाने ओरडण्याची वेळ माझ्यावर आली होती, पण मी तितक्याच थंड नजरेने बघत तिला बोलले - "no thanks"..
हसावं की रडावं या लोकांसमोर तेच कळत नाही कधी कधी.

पालघर जिल्ह्यात आदिवासी जमातींमध्ये खूप फॅड आलंय धर्मांतरचं. माया गप्पा मारायला लागली की खूप गोष्टी कळतात तिच्याकडून.
माया - "आमच्या नात्यांपैकी बऱ्याच जणांनी देव बदलले, पण मी आमचाच देव मानते"
मला नेहमीच कौतुक आहे तीच, तिच्या निश्चयी ठाम स्वभावाचं.
"सगळी जातात रविवारी चर्च मध्ये, खायला देतात ना, आमचा संयोग पण हट्ट करतो, आई आपण पण जाऊया...."

एका वाक्यात एक विदारक सत्य तिने माझा डोळ्यांसमोर आणून ठेवलं होतं..
"भूक"  माणसाला स्वतःचं स्वत्व विसरायला लावते...
नक्की कोणा कोणाला दोष द्यावा आता..
तुम्हाला - मला - की त्या देव नावाच्या संकल्पनेला???!!!

~ सुप्रिया घुडे
१३-जुलै-२०१९

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर