भिन्न - कविता महाजन

भिन्न - कविता महाजन


'एड्स' हा गाभा, या गाभ्याभोवती फिरणाऱ्या 'भिन्न' व्यक्तिरेखांच्या नजरेतून साकारलेली ही कादंबरी. भिन्न वाचून मन सुन्न नाही झालं तर नवल. एड्स या आजाराविषयी आधीच एवढे समज-गैरसमज आहेत, कि या बद्दल खुलेपणाने चर्चा होणं दूरची गोष्ट. २००५ च्या आकडेवारीनुसार जगात आजपर्यंत एकूण ३ कोटी ८६ लाख HIV ग्रस्त आहेत, आणि २८ लाख लोक एड्स ने मरण पावले आहेत. ही आकडेवारी आटोक्यात आणण्यासाठी एकमेव उपाय आहे, समाज प्रबोधन आणि HIV ग्रस्त रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचं आहे. HIV च्या प्रसारणाचं मूळ जातं वेश्या आणि तृतीयपंथीयांकडे त्यामुळे साहजिकच समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन एकूणच वाईट आहे. पण खरंच त्यांना या आजाराविषयी काहीच माहित नाहीये का, का ही लोकं आपल्यासारखे चांगली कामं करून पोट भरू शकत नाहीत, याचं अभ्यासपूर्ण विश्लेषण लेखिकेने या कादंबरीत केलेलं आहे. कादंबरी वाचून झाली कि आपोआप समाजाच्या या घटकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. वेश्या असोत, तृतीयपंथीय असोत, समलिंगी संबंध ठेवणारे असोत, drug addict असोत... त्यांच्या मानसिकतेचा आपण बारकाईने विचार करायला हवा. आपलं चाकोरीबद्ध - पांढरपेशे मन कधी त्यांच्या आयुष्याबद्दल विचारच करत नाही. बऱ्याचशा गोष्टीचा तर असा अचानकपणे कादंबरी मध्ये उलगडा होतो , जसं - "पंढरीच्या वारीच्या दिवसांत कंडोमची मागणी वाढते".. काही गोष्टी आपल्या नजरेपलीकडे असल्याने खरंच त्या आपल्या विचार पलीकडे सुद्धा आहेत ... ही कादंबरी आहे - महिला आणि एड्स या विषयावर काम करणाऱ्या सोबत या स्वयंसेवी संस्थेशी निगडित असलेल्या ३ महिलांची. रचिता शिर्के - एड्स झाल्याचे समजल्यावर तिची झालेली मानसिक तडफड, कुटुंबाची विस्कटलेली घडी, शेजाऱ्या - पाजार्यांच्या बदलेल्या नजरा, मुंबई सारख्या शहरात नोकरी निमित्त होणारी दगदग याचं वर्णन ती करते. एड्स च निदान करण्यासाठी मुंबई च्या एका वेश्या वस्तीत जाऊन एका एड्स सेन्टर वर जाऊन ती टेस्ट्स करून घेते.. निदान झाल्यावर मोडकळीस येते पण पुन्हा या सगळ्या परिस्थितीला सामोरी जाऊन, समाजाची तमा न बाळगता एड्स विरोधी चळवळीत कार्यकर्ती होते. रचिता शिर्के यांचं 'झुंज एड्स शी' हे आत्मचरित्र मराठीत उपलब्ध आहे. एड्स विषयक माहिती देणारी डॉक्टर, संशोधक व्यक्तींनी लिहिलेली पुस्तके मराठीत उपलब्ध असली तरी ललित स्वरूपाचे हे पहिलेच पुस्तक आहे. प्रा. विभा मोरे यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले आहे. प्रतीक्षा कमल - वेश्यावस्तीत एड्स विरोधी प्रबोधन करणारी स्वतःची संस्था(सोबत शी संलंग्न राहून) चालवणारी हि महिला. संस्था चालवताना होणारा सामाजिक विरोध आणि त्यातून होणारा तिला मानसिक त्रास, समाजासाठी काम करताना स्वतःच्या आयुष्यात प्रेमात ठेच खाल्ल्याने तिला येणारं depression, संस्था चालवताना येणारा आर्थिक ताण आणि या सगळ्याची परिणीती म्हणजे तिने केलेली आत्महत्या, हि वाचकाच्या मनाला चटका लावून जाते. लेनिना - सोबत मध्ये काम करणारी पूर्ण वेळ कार्यकर्ती. प्रतीक्षा तिची जिवलग सखी आत्महत्या करून मरण पावल्याने तिची संस्था लेनीना सांभाळायला घेते आणि मग तिला जाणवायला लागतं - आपल्या देशात एखादी NGO सांभाळताना येणारे आर्थिक प्रश्न, सरकारी funding मधला भ्रष्टाचार आणि एकूणच या आजार आणि रुग्णाकडे पाहण्याची लोकांची मानसिकता, हे सगळं बदलणं किती कठीण आहे. हि कादंबरी फक्त AIDS /HIV या विषयावर नसून, बाईच्या नजरेतून कुटुंब व्यवस्था, पर्यायी समाजव्यवस्था आहे. स्वतः बाबतीत सांगायचं झालं तर, मला या कादंबरी ने समाजाकडे पाहण्याचा वेगळा किंवा जाणता दृष्टीकोन दिला. ता. क. हल्लीच कविता महाजन यांच्या FB post मुळे कळलं कि 'भिन्न" हि कादंबरी मुंबई विद्यापीठाने B.A. अभ्यासक्रमासाठी लावलेली आहे.


- सुप्रिया घुडे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे