गोफ - गौरी देशपांडे


गोफ - गौरी देशपांडे




हळुवार गुंफत जाणारा गोफ. एकमेकांत गुंफत जाताना गाठ बसण्याची शक्यता अधिक. पण अलगत गुंफत जाणारा हा गोफ तसाच अलगद सोडवता यायला हवा, ती खरी कला.
सासू - सुनेच्या नात्यातला हा गोफ लेखिका लीलया विणत गेली आहे.
कथेतली २ महत्वाची पात्रं माँ(सासू) आणि वसुमती (सून), या दोघींच्या बाजूने उभं राहून आपण विचार करायला लागतो. या दोघींच्या आजूबाजूच्या पत्रांनाही या दोघींच्या गोफात गुंतवायला लागतो.
गौरी देशपांडे च कोणतंही पुस्तक घ्या, तिचं लिखाण डोक्यात शिरणे कठीण. अचानक कोणतं पात्रं कसं कथेत शिरेल नाही सांगू शकत नाही. आपण विचार करतो, काय हे अचानक? परंतु कथा जशी पुढे सरकत तेव्हा हा गोफ उलगडत जातो.
कथेतले मला भावलेले काही परिच्छेद मी इथे देत आहे -
"पण एकाएकी पोटातून वाटलं, की मुले किती आईबापांना चकवतात! अगदी अनाथाश्रमातच टाकून नाही दिले मुलांना, तर कसलेही दुष्ट आईबापसुद्धा एखाददुसरा तरी मायेचा कण आपल्या बरक्याश्या पोरावर फेकतातच. आणि ते सारे कण चोखून घेत मुले 'मोठी' होतात. आणि तिथेच तर सारा घोटाळा माजतो. थोर होऊन तोंडास तोंड देणाऱ्या, आपल्याइतक्या उंच, दांडग्या, रगेल मुलामुलींच्या आईबापांना ते बरीकसे, हातपाय हलवणारे, मुठी नाचवणारे, रडता रडता त्यांच्या स्पर्शाने शांत होणारे मूल कुठेच गवसेनासे च होते. त्याच्या सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या, त्यांना जीव की प्राण समजणाऱ्या गोड, मऊ चेहऱ्याऐवजी समोर उभा असतो एक कठोर न्यायाधीश!"
"आपण ज्याला काही दान करतो, तोच आपल्यावर खरं तर उपकार करत असतो"
"जर स्वतःशी इमानदारी करायची, तर कधीतरी दुसर्याशी बेमानी करायलाच लागते"
"आपसूक हाती आलेल्या गोष्टींची माणसाला किंमत वाटत नाही. वाटते, ती धडपड, कष्ट करून मिळवलेल्या श्रेयाची!"

~ सुप्रिया घुडे

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन