गणेश चतुर्थी २०१८




या माणसाने आमचा जीव टांगणीला लावला होता, गणेश आगमनाच्या दिवशी, चतुर्थी ला..
संयोग - मायाचा लेक.
१२-सप्टेंबर-२०१८
माया नेहमीप्रमाणे सकाळी आली कामाला माझ्याकडे.  माया ची कामं आटोपेपर्यंत नेहमी खेळत राहणारा तिचा लेक आज गपचूप खुर्चीत बसून झोपलेला बघून आश्चर्य वाटलं, तिला विचारलं तर कळलं ताप येतोय. मग माझंच अंथरूण घालून दिलं त्याला, झोपलं लेकरू.
१३-सप्टेंबर-२०१८
सुट्टी नव्हती आम्हाला ऑफिस मधून त्यामुळे रत्नागिरी न जाता गणेशोत्सव इथेच होता, म्हटलं माया आली तर बाकी कामं आटोपेल, मी मोदक करायला घेईन. पण ११ वाजले तरी काही तिचा मागमूस नाही, वाटलं लेकाला बरं नाहीये म्हणजे येणार नाही बहुतेक. आता तब्येतीचं कारण काढून उपयोग नव्हता, खायला हवं तर आचारी बनायची तयारी हवी 😀  डाळ - भात - बटाट्याची भाजी केली आणि मोदकाची तयारी सुरू केली. तेवढ्यात माया लेकाला घेऊन दारात हजर. म्हणते तुम्ही आवरलं का सगळं, संयोग ला बरं नाही तर सकाळीच dr कडे जाऊन आले.
आता माझं काम आटोपलं होतं, पण बाकीच्या घरात जायचं होतं, लेकाला बरं नसताना कुठे घेऊन फिरणार म्हणून दिवसभर संयोग ची baby sitting माझ्याकडे, म्हटलं येईल माया सगळी कामं आटोपून तोपर्यंत पोरगं झोपून राहील, औषधं घेऊन.
पण माझे मोदक बनवून नैवेद्य दाखवेपर्यंत संयोग उठला झोपेतून, उठल्यावर पहिला पप्रश्न - आई कुठे. आता झाली पंचायत. म्हटलं येईल आई तुला मोदक देते खायला. समोर खेळणी ठेवली पण आजारपणामुळे पोराचा लक्ष कशात लागेना. त्यात अजून माझी परीक्षा म्हणून शेजारचा छोटा मुलगा पण घरात आमच्या, आणि दोघांची भांडण सुरू - एकाच car वरून 😣
दोघा गणपतींना जेवायला वाढलं. संयोग थोडं खाऊन उठला, ताप वाढायला लागला तसं माझं tension अजून वाढायला लागलं. वाटलं माया एकदा तोंड दाखवून गेली लेकाला की पोरगं थोडं माणसात तरी येईल, माया चा फोन पण लागेना. संयोग ला झोपवलं. मला आणि कीर्ती ला जेवण पण जाईना.
सगळं आवरून आम्ही जरा बसलो तर हे पोरगं लागलं थरथरायला. ताप वाढत होता. मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता.
शेवटी शेजारच्या ताईना सांगून आले, माया कुठल्या wing मध्ये गेली असेल कामाला, तिला सांगून तरी येते, नाहीतर कोणाला call करून तरी सांगा..
इथे मी कपाळावर घड्या बदलतेय आणि माया ची वाट बघत दरवाज्याकडे डोळे लावून बसलेय.
मी आणि कीर्ती खूप दमलो, कीर्ती बोलायला लागली, गणपती बसवला असता तरी एवढी दमलो नसतो तेवढं आज संयोग च्या आजारपणाने दमलोय..
शेवटी माया ४.३० ला आली घरी आणि पोराला तिच्या मांडीवर दिल्यावर माझा जीव भांड्यात पडला. तोपर्यंत शेजारचे आमच्या घरात येऊन तिला बडबडायला लागले, पोराला सोडून गेली म्हणून, बिचारी पोराला पोटाशी घेऊन बसलेली.
सगळे निघून गेले तशी मला म्हणते त्या भैयाच्या घरातली कामच आटोपेना. घरात कोणी नाही आणि गणपती ठेवलाय. नैवेद्याचं करून दिलं आणि निघाले, सांगितलं लेकाला बरं नाहीये, भांडी पण नाही घासली.
बिचारी काही खाल्लं पण नव्हतं, मोदक दिले खायला, तिचा जीव लेकात अडकलेला.
विचारलं कशी जाशील आता याला घेऊन, तर म्हणे रिक्षाने. चल म्हटलं सोडून येते 2 wheeler ने.
पालघर हा आदिवासी म्हणून घोषित झालेला जिल्हा. पण इथे राहायला आल्यापासून इथले पाडे पाहायचा मुहूर्त आला नव्हता, आज माया च्या कृपेने संधी मिळाली. तिच्या खोपटी समोर गाडी लावल्या बरोबर तिथली सगळी पोरं जवळ येऊन बघायला लागली. माया कौतुकाने थोडी लाजून-संकोचून घर - आवार दाखवत होती. आणि संयोग घरी टुणकन उड्या मारून खुर्चीवर बसला.त्याला म्हटलं, वा रे लेका, तिथे जीव काढलास माझा आणि आता उड्या मार 😀
एव्हाना watchman पर्यंत पण बातमी पोचली. मी सोडून आले परत तर विचारतात संयोग ला dr कडे घेऊन गेला होतात का ओ? 😀
म्हटलं नाही, त्याच्या घरी सोडून आले.
Watchman काका - तिला सकाळीच बोललो एवढं बरं नाही लेकाला कशाला आलीस कामाला तर म्हणते लोकांच्या घरी सण आणि त्यावेळी नेमकी सुट्टी घेऊन कशी चालेल..
Madam, पण खरं सांगू ही गरिबी माणसाला अगतिक करून टाकते.
यावर माझ्याकडे बोलायला काही शब्द नव्हते.

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन