आज रविवार. आज मस्त आराम करायचा..

 आज रविवार. आज मस्त आराम करायचा..





... असं शनिवारीच ठरवलं होतं. तो रविवारची पहाट उजाडलीच ती हवेत गारठा घेऊन. मस्त त्या दुलई तुन अंग बाहेर निघत नव्हतं. पण बहिणीला काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं, त्यामुळे तिला सोडायला मला उठणं क्रमप्राप्त होतं. असो, तीला सोडून आल्यावर पुन्हा रजईत शिरायचं असं ठरवून बाहेर पडले. बाहेर जमीन ओली दिसली, अरे एवढं दव पडलंय?? मग लक्षात आलं, दवबिंदू नाही पावसाची रिपरिप आहे ती. 🤦 पण थंडी जशी हवी तशीच 🤗🌨️

घरी येताना वर्तमानपत्र घेऊन आले, नेहमी त्या tv/ मोबाईल वर बातम्या वाचून/पाहून कंटाळा आला होता. 

गॅलरी समोर बसून, इत्यंभूत पेपर वाचत, हातातल्या ऊन ऊन चहाचा घोट रिचवत रविवार सकाळची सुरुवात झाली 😍 तासा - दीड तासाने बहिणीचा इच्छित स्थळी पोहोचल्याचा कॉल येईलच तेवढ्यात एक झोप काढून घेऊ म्हणून पुन्हा रजई गुंडाळून घेतली. पण म्हणतात ना, गाढवाला ओझं वाहायची एवढी सवय झालेली असते की एखाद्या दिवशी ओझं कमी झालेल असेल तरी त्याला त्रास होतो 😅 तशी परिस्थिती आहे माझी 😜 जरा स्वस्थ बसलं की कामांची लिस्ट डोळ्यांसमोर दिसायला लागते. घरातली कामं करायला रविवारच तर मिळतो. पण निक्षून स्वतःला बजावलं - 'नाही. आज रविवार. आज मस्त आराम करायचा..'

पण अर्ध्या तासातच बहिणीचा कॉल आला आणि मग काही झोप लागेना. जाऊ देत त्यापेक्षा उठून कामाला लागलेलं परवडेल. 

कोळीष्टक काढून आज ceiling fans सगळे साफ करून घेऊ. आज मस्त आराम करायचा..

छ्या: 😓

तिन्ही गॅलरी धुवून घेऊ. लगे हातो बेसिन पण धुवून होतील. मग मस्त आराम करायचा..

छ्या:😓

पडदे धुवायचे राहिलेत कधीपासून, त्याला कितीसा वेळ लागतोय.. मग मस्त आराम करायचा..

छ्या:😓

आता एवढं केलीच आहेत कामं तर लादी पुसून घ्यायला किती वेळ लागतोय. तेवढं करून मग मस्त आराम करायचा..

छ्या:😓

अरे बापरे १२ वाजत आले, अजून दुपारच्या जेवणाची काहीच तयारी नाही. आज रविवार म्हटल्यावर वाटणाचं/वाटपाचं जेवण हवं, एकच तर दिवस मिळतो 'साग्रसंगीत' जेवण करायला. असो एकदा भरपेट जेवण झालं की ताणूनच द्यायचंय ...

जेवण बनवून होतंच तोवर बहिणीचा फोन येतो, न्यायला ये. चला मग येताना हाताशी २-३ कामं सुद्धा बाहेरची होऊन जातील.

 रविवारी वेळ मिळतो म्हणून खास एखादा पदार्थ करायचा ठरवलेला असतो. त्याची side by side तयारी सुरू असते. आठवाड्याभरासाठी खोबरं किसून भाजून ठेवणे, जमल्यास खडे मसाले वापरून सुकं वाटण करून ठेवणे हे उद्योग असतातच.

जेवून झाल्यावर त्या 'साग्रसंगीत' जेवणाची भांडी वाट बघत असतात 😓 सुरू करा मग - जयदेव जयदेव 👏 (आम्ही दोघी भांडी घासण्याला आरती करणे म्हणतो, त्यात खूप भांडी असतील तर महाआरती 😄)

असो, एवढं आवरूया मग मस्त आराम करायचा..

छ्या:😓

आता सगळी कामं आवरलीत, आता तरी ताणून द्यायचा विचार करावा तर 'Urgent Office Work' यावं.. हाय रे कर्मा 🙆 Work from home झाल्यापासून personal spce काही राहिली नाहीये 😑 Issue solve करत २ तास जावेत, वाजलेत का ५?? 🤷 आता कोण झोपतं?? 🙇

दर रविवारी संध्याकाळी आमच्याकडे एक प्रथा  पडली आहे. आत्ये, काका, मामा, मावश्या सगळ्यांचे एकमेकांना कॉल सुरू होतात; त्यात अगदी आरामात २-३ तास जातात. 

रविवारी संध्याकाळी दारात एखादी रांगोळी काढली जाते. अशा  काही वेगळ्या designs मी आधी शोधून ठेवते रेखाटायला. तेवढीच हाताला सवय राहते.

दिवाबत्ती ची वेळ झाली की अचानक जाणवत - कसा हा रविवार संपला?? 🤷 आराम करायचाच राहिला? कुठे वेळ गेला?? 🤔

आता जेवून रात्रीची 'महाआरती' संपली की सोमवार चे वेध सुरू. टिफिन ला काय बनवायचं पासून ऑफिस ची पेंडिंग काम काय उरलीत!! 😐

असो, आजचा रविवार तर गेला कामात. पुढच्या रविवारी नक्की आराम करायचा! 😅😄😃

~ सुप्रिया घुडे

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन