दत्तजयंती २०२१

 💮 दत्तजयंती २०२१ 🛐


।। श्री गुरुदेव दत्त ।।


बऱ्याच महिन्यांनी 'बऱ्याच' कामातून मोकळी झाले. विचार केला थोडं लिहायला बसू, कुठेतरी नवीन जागी भेट सुद्धा देता येईल. त्यासाठी दत्तजयंती चा छान मुहूर्त जुळून आला.


२ दिवस अगोदर पासूनच तब्येत नरम - गरम वाटत होती. मनात आलं दत्त महाराज या उत्सवाला माझ्याकडून सेवा करून घेतायेत की नाही! आश्चर्य म्हणजे दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी, संध्याकाळपासून एकदम फ्रेश - प्रसन्न वाटायला लागलं. म्हटलं चला, मस्त बेत आखू. नैवेद्य काय करायचे ती सगळी तयारी करून ठेवली.


दत्तगुरूंची आवडती संख्या सात. ७ प्रदक्षिणा घालाव्यात. फुलं ७ संख्येत वाहावीत.

तसेच दत्तगुरूंचे ५ अवतार.

म्हणून यावर्षी ५ अवतारांच्या आवडीचे ७ पदार्थ करायचे ठरवले ~

🕉️श्री दत्त : केशरी गोड भात, केशरी दूध

🕉️श्रीपाद श्रीवल्लभ : गव्हाच्या पिठाचा शिरा

🕉️श्री नृसिंह सरस्वती : घेवड्याच्या शेंगांची भाजी

🕉️श्री स्वामी समर्थ : कांदा भजी

🕉️श्री गजानन महाराज : ज्वारीची भाकरी, मिरचीचा ठेचा


खरं सांगायचं झालं तर दत्त महाराजांनीच माझ्याकडून हे सर्व करवून घेतले 😇


वसई मधील जवळपास सर्व ठिकाणांना specially मंदिरांना माझी भेट देऊन झालेली आहे. फक्त वज्रगड च दत्तमंदिर राहिलं होतं. या दत्तजयंती ला भेट द्यायचीच असं ठरवलं. 

दुपारी घरी नैवेद्य दाखवून झालाच होता. थोडा आराम करून संध्याकाळी निघाले. 


वसई स्टेशन च्या बाजूला असलेल्या नवघर बस स्टॅण्ड च्या बाहेर भुईगाव ला जाण्याऱ्या बसेस दर अर्ध्या तासाने सुटतात. येताना रिक्षा २ वेळा बदलून यावं लागलं. वज्रगड हुन डायरेक्ट पुन्हा स्टेशन ला येणारी रिक्षा मिळत नाही. त्यामुळे स्वतःच्या गाडीने आलेलं बरं असा विचार पक्का केला.


२-३ मिंटस line मध्ये उभं राहिल्यावर बस मिळाली. ₹२०/- तिकीट आहे. "हिरा डोंगरी" सांगितलं की वज्रगड च्या आधी एका बस स्टॉप ला बस थांबते. दत्तकृपेने  बस स्टॉप नसूनही वज्रगड च्या पायथ्याशी च माझ्यासाठी बस ड्राइवर ने बस थांबवली. 


विडिओ मध्ये पाहिलं की लक्षात येईलच, खूप गर्दी होती. जत्राच भरली होती म्हणू शकतो. 

YouTube : https://youtu.be/QMuc26psHBA


वज्रगड हा सागरी दुर्ग म्हणू शकतो. इथे सर्वजण हिरा डोंगरी या नावाने ओळखतात. वसई ते अर्नाळा या दरम्यानच्या समुद्र किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी / टेहळणीसाठी मराठ्यांनी वसई मोहिमेच्या वेळी या किल्ल्याची निर्मिती / उभारणी केली. पोर्तुगीजांवर वचक बसवणे हा हेतू होताच.

पोर्तुगिजांनी स्थानिक जनतेवर धर्मांतरासाठी अत्याचार केले. या जुलमाच्या तक्रारी पेशव्यांकडे गेल्यावर, इ.स १७३७ मध्ये नरवीर चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली गंगाजी नाईक, शंकराजी फडके, बाजी रेठरेकर इ मातब्बर सरदार पोर्तुगिजांचे समूळ उच्चाटण करण्यासाठी पुढे सरसावले. वसई मोहिमेत या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली.


गड झाडींनी भरलेला आहे. गडावर पोहोचण्यासाठी रस्ता बांधलेला आहे. साधारण १० मिनिटं टेकडी चढत गेलं की प्रवेशद्वारापाशी पोहोचतो आपण. गडाला २ प्रवेशद्वार आहेत. गडावरचे बुरुज जवळपास नष्ट झाले आहेत. तटाची / बुरुजांची बांधणी नुसते दगड रचून केलेली दिसते.

किल्ल्याची ऊभारणी युध्द पातळीवर केल्यामुळे या बांधकामात चून्याचा वापर केलेला आढळत नाही.

गडावर एक चौकोनी पाण्याने भरलेली विहीर आहे. 

एका झाडाखाली मारुतीची मूर्ती आणि बाजूला मोठं शिवलिंग आहे.


गडावर सुंदर दत्तमंदिर आहे.  औदुंबराच्या झाडाला धक्का न लावता मंदिराची उभारणी केलेली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गजानन महाराजांची सुंदर मूर्ती दिसते.


जवळपास गेले ५ वर्षं इथल्या दत्तगुरूंच्या दर्शनाची आस लागली होती. ती आता पूर्ण होणार होती...

दत्तजयंती ला बरेच भाविक दर्शनाला आले होते. शिस्तबद्ध रांग लावून दत्त गुरूंच दर्शन झालं. ते मोहक रूप डोळ्यात साठवत डोकं टेकलं आणि दत्तगुरूंकडून नारळ आणि एक रुपया हातात आला. 

मला माहित आहे ते सोबत आहेत बस्स ही पोचपावती त्यांनी पाठवली आणि त्याक्षणी अश्रूंचा बांध फुटला...... 🥺


।। श्री गुरुदेव दत्त ।।


Location :

Hira Dongari

Path To Datta Mandir, Nardoli Gaon, Vasai West, Giriz, Maharashtra 401201 https://g.co/kgs/uD4TFK


Video Backgroud Music Courtsey :

Album: Shri Datta Mauli - Vol. 2

Singer: Pandit Ajit Kadkade

Lyricist: Pravin Davane

Music By: Shank,Neel

Label: Venus

Released in: 2002

Mood:devotional

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे