तेरुओ आणि कांही दूरपर्यंत

गौरी देशपांडे च्या प्रत्येक कथेमध्ये प्रेमाचे निरनिराळे कंगोरे पाहायला मिळतात. 

तेरुओ 
आणि
कांही दूरपर्यंत



२. कांही दूरपर्यंत
मृत्यू हेच एक अखेरचं सत्य. मरण जवळ येताना आयुष्याचे बांधलेले ठोकताळे.
'...आयुष्याच्या शेवटीच स्वार्थत्याग फोल वाटतात, सुटलेल्या संध्या सोनेरी वाटतात आणि घडलेले मुर्खपणे महामुर्खपणे वाटतात...'
'कांही दूरपर्यंत' कथा आहे नात्यांची. नात्यातल्या आपलेपणाची. आपलेपणाने आपल्या जवळच्या व्यक्तीला होऊ घातलेल्या सुरक्षिततेच्या कवाचाची.
कथा एकदा वाचली .. धागा मिळेना, का असं शीर्षक..
पुन्हा.. पुन्हा वाचली.. मग काहीतरी गवसलं खरं..
कथा संपताना विचारात येणारं अवघडलेपण, आदर्शस्थानाला गेलेला तडा, त्यामुळे विखुरलेले मनाचे तुकडे, सांडलेले तुकडे ओंजळीत गोळा करण्यासाठी केलेली धडपड कांही.. कांही दूरपर्यंत...

१. तेरुओ..
नवरा - 'जनक'  सोबत 'ती' जपान ला येते. तिथे कथा २ समांतर रेषेवर सरकते - 'जपान व संस्कृती' आणि 'जपानमध्ये भेटलेला तेरुओ'.

जपान मधील थंडी, तिथल्या बार मधील वरिष्ठ 'ममासान', हिरोशिमा-नागासाकी आणि दुसऱ्या महायुद्धा बद्दल जपानी लोकांचे अनुभव. जपानी लोकांचा देवावर, पूर्वजांवर आणि बुद्धा वरील विश्वास. नियमांप्रमाणे वागणाऱ्या जपानी लोकांची रूढीप्रियता आणि नेमकेपणा. वसंत ऋतूतील साकुराच्या झाडांखाली बसून 'साके' पिण्याच्या पार्ट्या. त्यांची सुप्रसिद्ध 'tea ceremony'. तेथील 'सह'भावनेच्या कल्पना. त्यांचा स्वाभिमानी आणि आत्मसंतुष्टी स्वभाव, प्रचंड देशाभिमान आणि परक्यांशी आढत्येखोर, आखडून वागणं.
'...काटेकोर नियमांनी बांधलेली, इटूकल्या गोष्टीत बारीक आनंद मिळवणारी, सूक्ष्म सौंदर्याच्या सूक्ष्म कल्पनांत गुंतणारी, धर्म-तत्वज्ञान यांचीही कोडी-कोष्टक बनवणारी जपानी संस्कृती...'

आई-वडील गेलेले असल्याने तिला होणारी मृत्यू ची जाणीव, स्वतःचं आयुष्य वाढत असताना जवळ येणाऱ्या मृत्यूचा स्वीकार, साऱ्या मनुष्यजातीच्या मृत्यूचं प्रतीक असलेल्या हिरोशिमा ला भेट दिल्यानं सगळीकडे दिसणाऱ्या मृत्यूच्या खुणा, त्यात अचानक अंधारातून उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे भेटलेला, प्रेम करणारा - तेरुओ : संपूर्ण सुंदर, संपूर्ण हवासा, संपूर्ण वेडावणारा...
 
भाषेच्या फाफट पसार्या पलीकडील प्रेम.
तरीही भारतात परतल्यावर तेरुओला परत भेटायला जपानला न जाण्याचा तिने घेतलेला निर्णय.
जनक किंवा तेरुओ दोघांसोबत च्या नात्यात कटुता येऊ न देता, आठवणीतील प्रेम जपून ठेवून तेरुओ पासून दूर राहण्याच्या जाणिवेचा स्वीकार.

तेरुओ कथा आहे जाणिवेची. अस्तित्वाची जाणीव. अस्तित्व स्वीकाराची जाणीव. अस्तित्व संपुष्टात येण्याची जाणीव. मृत्यू ची जाणीव.

साऱ्या आयुष्याचं सार एका वाक्यात सांगणारा तेरुओ : "Let it Be!"
Let it be. असू दे. प्रेम असू दे, आनंद असू दे.
मिलन असू दे, विरह असू दे, दुःख असू दे, वियोग असू दे, निरोप घेणं असू दे, मृत्यूही असू दे. नको फक्त खंत. जे आपण घडवीत असतो, जे घडत जातं, ते हातात उरतंच. गळून जावा खेद आणि फुका पश्चाताप.
उगवणाऱ्या सूर्याच्या देशातला उगवणारा सूर्य : ते-रु-ओ 🌞

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे