चकवाचांदण (एक वनोपनिषद) - मारुती चितमपल्ली

चकवाचांदण (एक वनोपनिषद) - मारुती चितमपल्ली




एका वन अधिकाऱ्याचे अरण्य कथन म्हणजे चकवाचांदण, हे मारुती चितमपल्ली यांचं आत्मकथन आहे.
चकवाचांदण म्हणजे घुबड, म्हणूनच मुखपृष्ठावर घुबडाच चित्र दिसून येतं. एका पारध्याला विचारलं असता तो बोलला होता -
"ते पाखरू कलमूहा हाय. रानात सांजेला ते बोंबलू लागला की वाटेत आम्हाला चकवा मारतो. आमची रानभुल होते. आभाळात शुक्राची चांदणी दिसली की चकवा निघून जातो."
- म्हणून चकवाचांदण 🦉

ग्रंथाच्या सुरुवातीला लेखकाने त्यांच्या कुटुंबियांशी ओळख करून दिलेली आहे, ती माहिती महत्वाची ठरते कारण तिथून त्यांना वन्यजीवनाच्या अभ्यासाची प्रेरणा मिळालेली आहे.
अम्मा (आई ची आई - आजी) तिला रंगाची चांगली पारख होती. अम्माने रंगांविषयी दिलेल्या ज्ञानाचा फुलांच्या आणि पाखरांच्या रंगाचं हुबेहूब वर्णन करायला उपयोग झाला. अम्माला लिहिता वाचता येत नव्हतं पण पशुपक्ष्यांविषयी तिला खूप गोष्टी माहिती होत्या. त्यामुळे लेखकाच्या ज्ञानात खूप भर पडली.
रानाविषयीच लेखकाचं प्रेम अम्मा, माळकरिण आत्या, लिंबामामा आणि हणमंतमामाने जपलं.

शिक्षणात सतत आलेलं अपयश, नैराश्याने आयुष्यात संन्यास घेण्याचा निर्णय, मग फॉरेस्ट ऑफिसर म्हणून रुजू झाल्यावर सरकारी नोकरीत असताना झालेले मनस्ताप, बुरुडांकडून होणाऱ्या हल्ल्यात थोडक्यात कसे वाचले त्याविषयी लेखक बरेच विस्तृतपणे लिहितात.

तसेच पु. ल. देशपांडे, बाबा आमटे, व्यंकटेश माडगूळकर, गंगाधर गाडगीळ, जी. ए . कुलकर्णी सारख्या साहित्याकांच्या भेटीबद्दल पण लेखकांनी छान आठवणी दिल्या आहेत.

एक वनाधिकारी असून सामिष खाणे, पिणे, नाच गाणे यातील काहीच छंद न ठेवता त्यांनी साहित्य, लिखाण आणि अरण्य सहवास यातच समाधान मानले, हे जास्त कौतुकास्पद वाटते.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे - अरण्यकथन. जंगलातला समृद्ध अनुभव या वनोपनिषदात वाचायला मिळतो.
जंगलात फिरणाऱ्यांसाठी हा ग्रंथ एक उत्तम वाटाड्या म्हणून काम करू शकतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~
अशाच काही जंगलातल्या गोष्टी 🌳

🐾हत्ती हा जंगलातला कुशल अभियंता आहे. डोंगराळ भागातून रस्त्याची आखणी कशी करावी हे हत्तींपासून शिकावं.
🐾जंगलात फिरताना दृष्टीभास होतो - search image. तुम्ही एखाद्या प्राण्याचा इतका ध्यास घेता; की मग तो तुम्हाला समोर नसतानाही दिसू लागतो.
🐾अस्वल पाठीमागे लागलं तर पहाडीवर कधी चढू नये. पहाडीच्या खालीच पळावे. अस्वलाला वर चढणं सोपं असतं. पण उतारावर त्याच्या डोक्यावरचे केस डोळ्यावर येतात. त्याला पुढचं नीट दिसत नाही. त्याची गती कमी होते. तोपर्यंत आपण त्याच्यापासून दूर गेलेलो असतो.
🐾जंगलात फिरताना चितमपल्ली यांना आदिवासी लोकांची खूप मदत झाली.
असंच एकदा छत्तीसगड च्या सदा गोंड ने त्याच्या लहाणपणी ची हकीकत सांगितली. त्याच्या आजाजीनं लहानपणी सदाला असंच जंगलातून जाताना भूक लागली म्हणून वांदराचं काळीज भाजून दिलं.  काळीज खाल्ल्यावर ज्या-त्या जंगली जनावरप्रमाण माणसाचं मन होतं. माकडाच मन चंचल असतं पण वांदराची नजर मोठी जागली असते. वाघा-चित्याचा खडका पहिल्यांदा त्यालाच लागतो.
🐾ससे सहसा पाणी पिताना दिसत नाहीत. तेव्हा सदाने त्याबद्दल खुलासा केला - ससे प्रखर उन्हाळ्यात सुद्धा मोहाची फुलं खाऊन तहान भागवतात. फुलात नखाएवढं पाणी असतं.
🐾ज्या नराने सुंदर घरटं बांधलेलं असेल त्या घरट्याच्या शोधात सुगरणी असतात. आवडत्या घरट्यात अंडी-पिल्लं देत नांदतात. ज्यांना घर बांधता येत नाही त्यावर्षी त्या नरांना वधू मिळत नाही.
🐾नवेगावबांध पवनी येथील माधवराव पाटील हे चितमपल्ली यांचे खास सोबती. त्यांच्यासोबत जंगल भ्रमणात त्यांना बऱ्याच गोष्टी कळल्या.
लोकांचा समज आहे, की नाग व धामिण जुगतात. पण ते जुगण नसतं. द्वंद्वयुद्ध - जीवनमरणाची झुंज असते. धामण हे नागाचं आवडतं भक्ष्य.
🐾चितमपल्ली यांच्या मते पशु पक्ष्यांचं निरीक्षण करायला फार मोठी साधनं लागत नाहीत. एक दुर्बीण, नोंदवही, प्राणी पाहण्याची इच्छा - बस्स. आमच्या देशातल्या लोकांना उगीच या गोष्टींचा बाऊ वाटतो.
🐾पण त्यांनी काही ठिकाणी मुद्दाम सांगितलंय की जंगलात कुठेही पाणी पिऊ नये. स्वतःची पाण्याची व्यवस्था स्वतः करून बाहेर पडावं.
🐾जंगलात पशु-पक्ष्यांच्या निरीक्षणाला गेलं तर कुत्री बरोबर नेऊ नये. जो प्राणी दिसेल त्याच्या ती मागे लागतात.
🐾 प्रत्येक जंगली जनावरांच्या किती जवळ माणूस पोचू शकतो असं एक सुरक्षित अंतर असतं. त्या मर्यादेचं अतिक्रमण झालं की ते दूर पळतात. नंतर स्वसंरक्षणाच्या तयारीत राहतात. जंगली जनावरांना शोधून काढण्यापूर्वी च त्यांनी तुम्हाला पाहिलेलं असतं. कित्येकदा तुम्हाला न कळत काही अंतरावरून झुडुपातून ते तुमचं निरीक्षण करत तुमच्याबरोबर समांतर चालत असतात. तुमच्या शरीरातून येणाऱ्या वासावरून तुमचा हेतू ओळखतात.
🐾 अनोळखी जंगलातल्या वाटा आणि नाल्यांची नकाशाद्वारे माहिती करून दिशांची ओळख घेतलेली असणं आणि दिशा ओळखता येणं अतिशय आवश्यक असतं. सुरवातीला अनोळखी जंगलात हिंडताना कोयत्याने झाडाच्या बुंध्यावर खुणा करीत किंवा वाटेवरील झुडुपांच्या फांद्या अधूनमधून ओळखणी साठी टाकीत जावं लागतं; म्हणजे गेल्या वाटेनं तुम्हाला वाट न चुकता परत येता येतं. एवढी दक्षता घेऊनही वाट हरवली तर त्या जंगलातील नदी किंवा ओढ्याच्या काठाकाठाने प्रवाहाच्या दिशेनं जावं म्हणजे एखादं गाव किंवा माणसं भेटतात. त्यांना विचारून पुढची वाटचाल ठरवता येते.
🐾 निरगू गोंड ने रानकुत्रे स्थलांतर का करतात ते सांगितलं -
एखादा लगीन समारंभ असावा तसा रान कुत्र्यांचा मेळावा असतो. काळपावर त्यांच्या शिकारीचं यश अवलंबून असतं. पण कळापातल्या एका वयात आलेल्या कुत्र्याशी (तो जुमानत नसल्यानं) म्होरक्याचं जमत नाही. मग उपासमार होते. मग हा प्रश्न सोडवायला तळ्यावर आजूबाजूच्या परिसरातील कुत्री जमा होतात. असंतुष्ट कुत्र्यांना एकमेकांच्या कळपात समंजसपणे सामावून घेतलं जातं. या अदलाबदली मुळे कळप पुन्हा निरोगी होतो.
🐾 रानकुत्रे हरण्या रंगाच्या बकऱ्या, गायी व बैल यांवर आवडीने हल्ला करतात, कारण ती त्यांना जंगली जनावारांसारखी वाटतात. त्यामुळे जंगला शेजारील गांवात गुरं बहुदा पांढऱ्या रंगाची असतात.
🐾 वाघळानी चावलेली कोल्हे पिसाळतात आणि गावातल्या कुत्र्यांना चावली की तीही पिसळून वेडी होतात.
🐾 वाटाड्या टांगसू महाजन ने सांगितलेली हकीकत -
वानरं हरतऱ्हेची पानं गोळा करून मधाच्या मोहोळात मिसळून त्याचे लाडू बनवतात आणि झाडांच्या पोखरीत लपवून ठेवतात. अकाल पडला, पाणी मिळेनास झालं की वानरं ते खातात. मधामुळे त्यातली पानं सुकत, सडत नाहीत.

🌳 अशा एक ना अनेक जंगलातल्या गोष्टी वाचताना आपण त्यातच हरवून जातो..
~~~~~~~~~~~

आपल्याला मोजकेच जंगली प्राणी माहीत असतात, त्याही पलीकडचं जंगल लेखक या ग्रंथात आपल्यासमोर आणून ठेवतात. आपण वाघ दुर्मिळ होत चाललेत म्हणून त्यांना वाचवण्यासाठी एवढ्या मोहिमा हाती घेतल्या. पण अजून आपल्याला ज्ञात नसलेले कितीतरी प्राणी पक्षी जे आदिवासींमुळे जिवंत होते ते आपल्यासारख्या मूर्ख मनुष्य प्राण्यांच्या शहरीकरणाच्या हव्यासपोटी नामशेष होत आहेत आणि झाले आहेत. आणि यासाठी आपल्याला चितमपल्ली यांसारख्या वनाधिकाऱ्याची खरंच गरज आहे.
आणि त्यांनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे जंगलभ्रमंतीचा encyclopedia.
निसर्गाची आवड असलेल्या प्रत्येकाने संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ - चकवाचांदण 🦉

~ सुप्रिया घुडे

Comments

  1. Gist दिलेलं आहेत

    ReplyDelete
  2. खूप अभ्यास करून दिली गेलेली माहिती आहे.जंगलाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता निश्चितच निर्माण झाली आहे.धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. या ग्रंथातील माहिती वाचताना जबरदस्त वाटतं.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन