लेण्यांच्या देशा - रवींद्र गोळे

लेण्यांच्या देशा - रवींद्र गोळे

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।
कवी गोविंदाग्रज यांच्या गीतातील या २ ओळी. महाराष्ट्र ज्यांनी 'पाहिलाय' त्यांनाच उमजतील.

लेण्यांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रातील अग्निजन्य खडक  उपयुक्त आहे. देशात एकूण बाराशे लेणी आहेत. त्यापैकी ८०% म्हणजे ८०० लेणी महाराष्ट्रात आहेत.
यावरच लेखक रवींद्र गोळे यांचं हे पुस्तक - 'लेण्यांच्या देशा'.

या पुस्तकात महाराष्ट्रातल्या सर्व लेणी समूहाची दखल घेतली आहे. लेखक वाचकाला ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, कलात्मक पार्श्वभूमी देऊन लेण्यांकडे पाहण्याची दृष्टी विकसित करतात.

 • लेणी म्हणजे बौद्ध भिक्षूंची विश्रामगृह होती, त्यांना संस्कृतमध्ये लयनम् व प्राकृतमध्ये लेणं म्हणतात.
भारतातील पाहिलं ज्ञात लेणं 'बाराबार' हे बिहार राज्यात आहे आणि महाराष्ट्रातील 'भाजे लेणं' हे सर्वांत जुनं आहे.
 • लेण्यातील शिल्प, मांडणी यांच्या आधारे लेण्यांची विभागणी ३ गटांत होते - बौद्ध, जैन आणि हिंदू (ब्राह्मणी)
 • बौद्ध लेण्यांचे पुन्हा २ प्रकार - विहार आणि चैत्यगृह
 • विहार म्हणजे बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान. बौद्ध संघाचा विस्तार झाल्यानंतर अनेक भिक्षु वर्षाकाळात एकत्र राहू लागले, अशा विहाराला 'संघाराम' म्हणत.
 • चैत्य म्हणजे प्रार्थनागृह. चैत्यगृहाचे पुन्हा २ प्रकार - हीनयान आणि महायान.
हीनयान - जुनी पध्दत यात बुद्धाला प्रतिकात्मक स्वरूपात पूजलं जायचं
महायान - मूर्तिपूजा करणारा नवीन पंथ उदयास आला
 • महाराष्ट्रातील लेणी - अगाशिव, अजिंठा, अंकाई-टंकाई, आंभिवले-टेम्भरे, आंबेजोगाई, औरंगाबाद, कऱ्हाड, कान्हेरी, कार्ले, कुडा-मांदाड, कोंढाणे, खरोसा, खेड, गारोडी, गोमाशी, घटोत्कच, घारापुरी, नाशिक, चौल-रेवदंडा, जीवदानी, जुन्नर, जोगेश्वरी, टाकळी-ढोकेश्वर, ठाणाळे-नाडसुर, त्रिनगळवाडी-इगतपुरी, धाराशिव, पन्हाळेकाजी, पाटण-तामकणे, पाटणादेवी, पाताळेश्वर-भांबुर्डे, पाटेश्वर, पातूर, पुसुसोताळे, पाले, पितळखोरे, महाड, महाकाली, पोहोळे, बेडसे, भाजे, भामेर, मंडपेश्वर, मांगीतुंगी, मोहिडा तर्फ हवेली, येरफळ, वेरूळ, लेणवली खडसावला, लोनाड, शिउर, शिरवळ-वाई, हरिश्चंद्रगड
 • दक्षिण हिंदुस्थानी कलेच्या दृष्टीने 'अगस्तीय सकलाधिकार' हा ग्रंथ महत्वाचा आहे, यात मूर्तीच्या प्रमाणाविषयी नियम दिलेले आहेत आणि ते नियम आजही दक्षिणेतील मूर्तिकार पाळतात.
 • शास्त्रशुद्ध शिल्प बनवण्यासाठी प्राचीनकाळी मोजमापासाठी ताल, अंगुलं ही एककं वापरली जात. एका तालाचा बारावा भाग म्हणजे अंगुल.
पुरुषांची मूर्ती अष्टताल, स्त्रीची सप्तताल, मुलाची पंचताल, दैवी मूर्ती नउताल तर राक्षसी दहाताल असते.
शिल्प बनवताना ३ गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात - ध्यान, लक्षणं, शरीरावयांची मोजमापं.
 • लेणी खोदणार्या कारागिरांना त्यांच्या विशेष ज्ञान आणि अनुभवावरून काम देण्यात येत असे - नवकर्मिक, सेलवडकी, रुपकार, मिथिक
 • शिल्पकलेचे २ भाग पडतात - देवताविषयक आणि लौकिक शिल्पकला
 • वात्सायनाने चित्रकलेची सहा अंग सांगितली आहेत - रुपभेद, प्रमाण, भाव, लावण्ययोजना, सादृश्य, वर्णिकाअंग. या सहाही अंगांचा अजिंठा लेण्यात पुरेपूर प्रत्यय येतो.
'अभिलाषितार्थ चिंतामणी' या ग्रंथात कोणत्या वस्तूपासून कोणते रंग तयार करावे हे सांगितलं आहे -
श्वेत रंग - शंखाचं चूर्ण, तांबूस - हिंगुळ, रक्तवर्ण - अळीता, भगवा - गेरू, पिवळा - हरताळ, काळा - काजळ
 • अजिंठ्याच्या चित्रकलेत २ प्रकार आढळतात - सजावटीसाठी आणि बोधप्रद चित्रं
 • वेरूळ मध्ये २-३ मजली तीन धर्म-संप्रदायाची लेणी आहेत :
१-१२ बौद्ध लेणी, १३-३० हिंदू लेणी, ३१-३३ जैन लेणी

ही आणि अशी बरीच माहिती लेण्यांच्या देशात वाचताना मिळते.

पुस्तक वाचताना लेणी अभ्यासण्याचे / पाहण्याचे विविध पैलू लक्षात येतील. आणि पुढच्या वेळी भेट देताना लेखकाने सांगितलेले मुद्दे लक्षात घेऊनच लेणी डोळसपणे पाहू अशी खात्री वाटते मला.

~ सुप्रिया घुडे

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन