पेनकिलर घेताय? जरा जपून!

Published: Tuesday, January 14, 2014

कामाची डेडलाइन जवळ आलेली असते, प्रत्यक्ष कामापेक्षा बॉस आणि सहकाऱ्यांना सांभाळून घेण्यात जास्त एनर्जी जात असते आणि अशातच डोके ठणकायला सुरुवात होते. अशा वेळी सर्वात जवळचे काय वाटत असेल, तर ती वेदनाशामक गोळी (पेनकिलर). एक गोळी आणि पंधरा मिनिटांत कामाला सुरुवात.. हात दुखत असो किंवा पाठ, दाढ दुखत असो किंवा पायाचा घोटा.. पेनकिलरच्या जादुई मात्रेने सर्व सुरळीत होते आणि त्यासाठी पेनकिलरचे आभार मानावेत तेवढे कमीच. वैद्यकशास्त्राने सामान्यांच्या हातात दिलेल्या या संजीवनीने शहरातील धकाधकीच्या जीवनातील गाडे सुरळीत चालले आहे. पण ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खाता येत नाही, तशी पेनकिलरचीही गोडी लागता उपयोगाची नाही.
कोणत्याही औषधांच्या दुकानात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या गोळ्या या पेनकिलरच्या असतात. गल्लीतल्या केमिस्टकडेही दिवसाला दहा ते पंधरा पाकिटे हातोहात विकली जातात. एकूण औषधांच्या तुलनेत वेदनाशामक गोळ्यांच्या विक्रीचे प्रमाण सुमारे तीस टक्के आहे. या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत असल्या, तरी त्या वापरताना सावध राहायला हवे. वेदनाशामक गोळ्या आजार बरा करत नाहीत. शरीरातील एखादा अवयव दुखू लागला, की तेथून मेंदूला रसायनांच्या माध्यमातून संदेश पाठवले जातात. पॅरासिटेमॉल असलेल्या गोळ्या मेंदूकडे येणारे व तेथून जाणारे वेदनेचे संदेश अडवण्याचे काम करतात आणि त्यामुळे वेदना होत असल्याचे लक्षात येत नाही. आयबुप्रोफेन असलेल्या गोळ्या वेदना होत असलेल्या ठिकाणी काम करतात. वेदना उत्पन्न करणाऱ्या रसायनांवर नियंत्रण ठेवून दाह कमी होतो.
''वेदनाशामक गोळ्यांमुळे फायदा होतो, पण काही वेळा गंभीर परिस्थितीतही निर्माण होते. या गोळ्या केमिस्टकडून थेट घेता येत असतील तरी त्यांची क्षमता (स्ट्रेंथ) वेगवेगळी असते. शंभरातील एका रुग्णाला एखाद्या गोळीनेही त्रास होतो. अस्पिरीनमुळे हृदय तसेच मेंदूकडे जाणाऱ्या वाहिन्यांत ब्लॉकेज निर्माण होतात. काही वेळा जठराला ओरखडे पडून रक्तस्राव होतो. अनेकदा अत्यवस्थ रुग्णामध्ये हे नेमके कशामुळे झाले, तेदेखील डॉक्टरांच्या पटकन लक्षात येत नाही. सांधेदुखीसाठी देण्यात येणाऱ्या 'कॉक्स टू इन्हिबीटर'मुळे मोठ्या आतडय़ामध्ये अल्सर झालेले रुग्ण उपचारांसाठी येतात. काही वेदनाशामक गोळ्यांमुळे मूत्रिपडावर प्रभाव पडतो,'' असे ज्येष्ठ पोटविकारतज्ज्ञ डॉ. रेखा भातखंडे यांनी सांगितले. वेदनाशामक गोळी घेण्यापूर्वी वेदना नेमकी का होत आहे आणि ते कारण कमी करता येईल का, याचाही विचार व्हायला हवा. वेदनाशामक गोळी घेण्याचे मुख्य कारण म्हणजे डोकेदुखी. डोके दुखत असेल तर त्यामागे अपुरी झोप, सर्दी, ताण, उपास अशी कारणे असू शकतात. गोळी इन्स्टंट रिलीफ देत असली, तरी मूळ कारणावर उपाय केला तर पुन्हा पुन्हा गोळ्यांकडे वळावे लागणार नाही. वेदनाशामक गोळी हा केवळ तात्पुरता उपाय आहे. डॉक्टरांकडे जाण्याच्या वेळेपुरते आराम पडावा यासाठी त्याचा उपयोग करावा.
सध्या इंटरनेटद्वारे वेदनाशामक गोळ्यांच्या खऱ्या-खोटय़ा दुष्परिणामांची माहिती अनेकांपर्यंत पोहोचली असेल. पण दुखणं आले की ही वाचलेली माहिती बाजूला पडते आणि पाकिटातून पेनकिलर काढून तोंडात टाकली जाते. ती तोंडात टाकण्याआधी पुन्हा एकदा विचार करावा, एवढय़ासाठी हा लेखप्रपंच..
पेनकिलरचे प्रकार
पॅरासिटेमॉल : डोकेदुखी किंवा बहुतांश दुखण्यात हे वापरता येते. त्याचे दुष्परिणाम अजूनही अनिश्चित आहेत.
आयबुप्रोफेन किंवा अस्पिरीन :  सांधेदुखी किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी होत असलेल्या वेदनेसाठी आयबुप्रोफेन, डायक्लोफिनॅक उपयोगी पडतात. मात्र वेदना होत नसताना अधिक काळ या गोळ्या घेतल्यास पोट बिघडणे, रक्तस्राव, मूत्रिपड व हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्या घेऊ नयेत.
कोडेइन : स्वतंत्ररित्या प्रभावी नसल्या तरी पॅरासिटेमॉलसोबत लहान प्रमाणात कोडेइन वापरलेल्या गोळ्या वेदनाशामक म्हणून प्रभावी ठरतात.
हे लक्षात असू द्या!
'रिकाम्या पोटी कोणतीही गोळी घेऊ नये.
'भरपूर पाणी प्या.
'एकापेक्षा अधिक पेनकिलर घेण्याचा मोह टाळा. ( गोळ्यांचा प्रभाव जाणवण्यासाठी साधारण १५ ते ३० मिनिटे लागतात. तोपर्यंत धीर धरा.)
'वेदनाशामक गोळ्यांची स्वतला सवय लावू नका.
'दोन दिवसांपेक्षा जास्त काळ दुखणे सुरू राहिले, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
'तुम्ही घेत असलेल्या गोळ्यांच्या दुष्परिणामाविषयी डॉक्टरांकडून माहिती घ्या.
'दारू आणि वेदनाशामक गोळी यांचे मिश्रण धोकादायक असते. (गणेशविसर्जनावेळी िस्टग रे चावण्याच्या घटनेत दारू प्यायलेल्या रुग्णांवर वेदनाशामक औषधांचा उपयोग होत नव्हता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली, असे नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले होते.)
विशेष काळजी घ्यावी..
उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह असे आजार असलेल्यांनी कोणतीही औषधे स्वतच्या मनाने घेऊ नयेत. या आजारांसाठी सुरू असलेल्या औषधांसोबत नेमक्या कोणत्या पेनकिलर योग्य ठरतील, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वेदनाशामक गोळी न घेता चालू शकते का?
'पाठ भरली असेल, पायाचे स्नायू दुखत असतील, तर गरम पाण्याच्या पिशवीने शेक देता येईल. गरम पाण्यात पाय ठेवून बसल्यानेही बरे वाटते. सर्दीने डोके दुखत असेल, तर पाण्याची वाफ घ्यावी.
'अंग मोडून आले असेल, स्नायू आखडल्यासारखे वाटत असेल, तर स्ट्रेचेससारखे सोपे व्यायामप्रकार करता येतील. हात, पायाचे स्नायू ताणले जाऊन बरे वाटेल. रोज सकाळी उठल्यावर पाच ते दहा मिनिटात हे व्यायामप्रकार केल्यास उत्तमच.
'उत्तम आहार हा तर प्रत्येक आजारावरील रामबाण उपाय. सर्दी, डोकेदुखीवर आल्याचा चहा आणि सुजलेल्या भागावर हळदीचा लेप हे उपाय अजूनही विस्मरणात गेलेले नाहीत. जेवणात आले आणि हळदीचा वापर केल्यास लहान-मोठ्या कुरबुरी कमी होतील.

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन